(सातारा)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या हातावर पेनाने ‘सुसाईड नोट’ लिहून या डॉ. संपदा मुंडे यांनी जीवन संपवल्याने वैद्यकीय क्षेत्रासह समाजात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासाबाबत सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी मंगळवारी महत्वाची माहिती दिली.
आरोपींसोबत वारंवार चॅटिंगचा उलगडा
पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, तपासादरम्यान मृत डॉक्टर संपदा मुंडे आणि आरोपींमध्ये वारंवार चॅटिंग होत असल्याचे समोर आले आहे. या संवादातून दोघांमध्ये काही वैयक्तिक संबंध होते का, हे शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. डीवायएसपी यांच्या मार्फत त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. प्राथमिक पोस्टमॉर्टेम अहवाल पोलिसांना मिळाला असून अंतिम पीएम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक अहवाल आज (मंगळवारी) मिळण्याची शक्यता आहे, असेही दोशी यांनी स्पष्ट केले.
डॉक्टर महिला ज्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या, त्या ठिकाणचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार त्या हॉटेलमध्ये एकट्याच गेल्या होत्या आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आली नाही. तरीसुद्धा त्या हॉटेलमध्ये जाण्याचं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे, असं दोशी म्हणाले. या प्रकरणातील तपासावर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव नसल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. “गृह विभागाकडून आम्हाला तपास पूर्णपणे निष्पक्षपणे करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत आणि त्यानुसारच तपास सुरू आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डॉक्टर युवतीने आयसी कमिटीकडे तक्रार केली नव्हती. मात्र पोलीस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी होत्या. आरोपींच्या बाबतीत फिट आणि अनफिट रिपोर्ट देण्यावरून डॉक्टर आणि पोलिसांमध्ये मतभेद होते. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने तीन वेळा बदलीच्या बाबतीत विचारणा होऊन देखील फलटणमध्येच काम करेन, यासाठी तिचा आग्रह होता. त्यासाठी विशेष ऑर्डर करून बदली थांबविण्यात आली होती. पोलिसांनी घटनेतील मोबाईलचा सीडीआर काढला आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी डॉक्टर युवती प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. यावेळी फोटो काढण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता.

