(नवी दिल्ली / वृत्तसंस्था )
NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सकाळी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यांची जलद सुनावणी करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची व्यवस्था करण्यासंदर्भातील विधेयक संसदेत आणण्याची तयारी सुरू असल्याची घोषणा त्यांनी केली. याचवेळी देशभरात विविध विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र झाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे.
“पेपरफुटी किरकोळ विषय नाही” : पंतप्रधान मोदी
व्हिडिओ संदेशात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “पेपर लीक हा किरकोळ विषय नाही. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. त्यामुळे पेपरफुटीनंतर गेल्या अडीच महिन्यांत सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत.”
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, ही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी होती. त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लावून सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा यशस्वीरीत्या घेण्यात आली. १९ जुलै रोजी निकालही जाहीर करण्यात आला असून अनेक विद्यार्थ्यांच्या यशाच्या बातम्या देशभरातून समोर आल्या आहेत.
फास्ट ट्रॅक कोर्टासाठी विधेयक संसदेत
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, केवळ परीक्षा घेऊन सरकार समाधान मानणार नाही. “मी संबंधित विभागांना फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले होते. दिवसभर मेहनत करून विभागाने मसुदा तयार केला आहे. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होईल. संसदेच्या दुसऱ्या आठवड्यात हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.” या घोषणेमुळे पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर जलद न्यायप्रक्रिया आणि कठोर शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरात आज आंदोलनाची हाक
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आज (२४ जुलै रोजी) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत आंदोलनासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान सर्व संघटनांनी CJP ने मांडलेल्या चार प्रमुख मागण्या जाहीरपणे वाचून दाखवाव्यात तसेच “इन्कलाब जिंदाबाद” आणि “भारत माता की जय” अशा घोषणा द्याव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.
CJP च्या चार प्रमुख मागण्या
आंदोलनाच्या माध्यमातून CJP ने केंद्र सरकारसमोर चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
- आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.
- विद्यार्थी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.
- दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी.
जंतरमंतरवरील आंदोलनाला हिंसक वळण
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागले. मिळालेल्या माहितीनुसार, जंतरमंतर येथे चार हजार लोकांची क्षमता असताना सुमारे १२ हजार आंदोलक जमा झाले होते. त्यामुळे गर्दी टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्गापर्यंत पसरली. स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
सोनम वांगचुक यांचे शांततेचे आवाहन
जंतरमंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “२६ वा दिवस… शांतता आणि केवळ शांतता हाच माझा मार्ग आहे. काही समाजकंटक शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. समोरची बाजू काहीही करत असली तरी आपली प्रतिक्रिया सद्भावनेचीच असली पाहिजे.” दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना देशभरातून पाठिंब्याचे आवाहन
CJP ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे देशभरातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन करून विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवावा आणि शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजप पुरस्कृत गुंड आंदोलनात घुसल्याचा आरोप
बुधवारी रात्री झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनातील प्रमुख नेते अभिजित दीपके यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “भाजप पुरस्कृत काही गुंड आंदोलनात घुसून दगडफेक करून आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”
सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव, CJP ची भूमिका स्पष्ट
केंद्र सरकारकडून CJP सोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत CJP ला चर्चेसाठी चार प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र CJP ने सरकारला स्पष्ट शब्दांत उत्तर देत म्हटले आहे की, “सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी जंतरमंतरवर यावे किंवा तटस्थ ठिकाणी चर्चा करावी. आम्ही कोणत्याही मंत्र्यांच्या घरात किंवा कार्यालयात चर्चा करण्यासाठी जाणार नाही.”

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. नीट पेपरफुटी प्रकरणावरून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत, बेमुदत उपोषणाला बसलेले वांगचुक यांनी अखेर २६ दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. सरकारकडून मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण संपवण्याचा निर्णय घेतला. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रथम सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह तसेच लेह-लद्दाखच्या सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण अधिकृतपणे मागे घेतले.
