(मुंबई)
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा अखेर 11 दिवसांनी उलगडा झाला आहे. सुरुवातीला चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता फॉरेन्सिक तपासातून या चौघांच्या मृत्यूमागे उंदीर मारण्याच्या औषधातील झिंक फॉस्फाईट कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (44), पत्नी नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (16) व झैनब (13) यांचा समावेश आहे.
कलिंगड आणि बिर्याणीवरून निर्माण झाली होती भीती
25 एप्रिलच्या रात्री डोकाडिया कुटुंबाने बिर्याणी आणि कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. 26 एप्रिलच्या पहाटे प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रथम एका मुलीचा, त्यानंतर दुसऱ्या मुलीचा आणि काही तासांतच आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कलिंगड आणि बिर्याणीमुळे विषबाधा झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती.
फॉरेन्सिक अहवालात मोठा खुलासा
प्राथमिक फॉरेन्सिक तपासात मृतांच्या मेंदू, हृदय आणि आतड्यांचा रंग हिरवट पडल्याचे आढळले होते. त्यानंतर कलिना फॉरेन्सिक सायन्स लॅब येथे नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांच्या अहवालानुसार चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईटचे अंश आढळले. झिंक फॉस्फाईटचा वापर प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात केला जातो. त्यामुळे मृत्यूचे खरे कारण आता समोर आले आहे.
आत्महत्या की घातपात? तपास सुरू
हे विष शरीरात कसे गेले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ही सामूहिक आत्महत्या होती की कोणीतरी विष देऊन हत्या केली, याबाबत तपास सुरू आहे. मात्र, डोकाडिया कुटुंबाच्या नातेवाईकांनी कोणत्याही कटाची शक्यता फेटाळून लावली असल्याची माहिती समोर आली आहे.
कलिंगड आणि बिर्याणीबाबत भीती नको
या प्रकरणानंतर कलिंगड आणि बिर्याणीबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासात या खाद्यपदार्थांमध्ये कोणतीही भेसळ आढळून आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना विनाकारण घाबरू नये, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची निवड करावी, असे आवाहन केले आहे.

