(सोलापूर)
सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, वाढदिवसाच्या पार्टीवरून परतणाऱ्या तिघा जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावरील हैदराबाद रोडवर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात शेखर सुरेकर (वय 33, रा. कुमठा नाका, सोलापूर), अमोल धैर्यशील येरटे (वय 40, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) आणि कादर सैदू हांडे (वय 33, रा. कुमठा नाका, सोलापूर) यांचा मृत्यू झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कादर हांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वाढदिवसाच्या जेवणावरून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, पाच मित्र वाढदिवसानिमित्त पुणे रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते पहाटेच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद महामार्ग मार्गे परत येत होते. त्यावेळी त्यांची ईर्टिगा कार (MH 13 EK 7209) भरधाव वेगात होती. डी-मार्टजवळील पर्ल गार्डनसमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण की कार 150 फूट फरफटली
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की कार तब्बल 150 फूट फरफटत गेली. कारचे छत पूर्णपणे उडून बाजूला पडले होते. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या भीषण अपघातात स्वरूप कोथिंबीरे (27) आणि अमित राजेश जाधव (30) हे दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, कादर हांडे याचा ७ मे रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी बुधवारी रात्री कादर आपल्या चार जिवलग मित्रांसोबत पुणे रोडवरील एका धाब्यावर गेला होता. रात्री बारा वाजता वाढदिवस साजरा करून सर्वजण कारने (एमएच 13 ईके 7209) घरी परतत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास तुळजापूर नाका चौकाजवळील पर्ल गार्डनसमोर त्यांच्या भरधाव कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला (एमएच 13 सीयू 8699) पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारचे छत उडून बाजूला पडले, तर धडकेनंतर कार सुमारे शंभर फूट फरफटत गेली. या भीषण अपघातात शेखर, अमोल आणि ज्याचा वाढदिवस साजरा केला जात होता त्या कादर हांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कार अमोल येरटे चालवत होता, तर शेखर सुरेकर हा चालकाच्या मागील सीटवर बसला होता. कादर हांडे चालकाच्या शेजारील सीटवर होता. स्वरूप कोथिंबीरे आणि अमित जाधव हे दोघे मागील सीटवर बसले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या होत्या. मात्र, धडक इतकी भीषण होती की त्याचाही प्रवाशांना कोणताही फायदा झाला नाही. अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज यावरून येतो की, कार चालकाच्या बाजूचा दरवाजा तुटून थेट टेम्पोला अडकून राहिला होता.
वळणावर उभा ट्रक दिसला नाही
प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरील वळणावर उभा असलेला ट्रक कारचालकाला वेळेत दिसला नाही. त्यामुळे भरधाव कार थेट ट्रकवर आदळली. गुरुवारी सकाळी पाचही मित्रांचे नातेवाईक तसेच मित्र परिवाराने शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावत होते. या घटनेनंतर महामार्गावरील पार्किंग सुरक्षा आणि रात्रीच्या वेगमर्यादेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

