(नांदेड)
नांदेड जिल्ह्यातील एका खळबळजनक हत्या प्रकरणात भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून पतीला विजेचा शॉक देऊन हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर हा निकाल देण्यात आला. आम्रपाली भीमराव हैबते (रा. तळेगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिने पती भीमराव नागोराव हैबते यांची हत्या केल्याचे न्यायालयीन सुनावणीत स्पष्ट झाले.
2019 मधील हत्येचा उलगडा
15 जून 2019 रोजी भीमराव हैबते हे मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन झोपले होते. त्यावेळी आरोपी आम्रपाली हिने घरातील विद्युत वाहिनीच्या साहाय्याने बाजेवर झोपलेल्या पतीला विजेचा शॉक दिला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पतीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता आरोपीकडून विसंगत उत्तरे मिळाली. त्यामुळे प्रकरणाचा संशय वाढला.
पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा निर्णय
मयताच्या बहिणीच्या तक्रारीवरून उमरी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान 9 साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि दाम्पत्याच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. या सर्वांच्या आधारे भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधीश मोहम्मद नासिर मोहम्मद सलीम यांनी आरोपी महिलेला जन्मठेप, दंड आणि सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. अनुराधा डावकरे यांनी युक्तिवाद केला.

