(मुंबई)
देशात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईचा मुद्दा तापला असून त्यावरून विधानभवन परिसरात विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी हातात सिलिंडरचे पोस्टर घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “सरेंडर दे सिलिंडर” अशा घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. विरोधकांचा आरोप आहे की आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक आणि छोटे-मोठे उद्योगधंद्यांना बसत आहे.
‘सरकार अमेरिकेसमोर सरेंडर झाले’ – नाना पटोले
या आंदोलनादरम्यान नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर टीका करत केंद्र सरकार अमेरिकेसमोर झुकल्याचा आरोप केला. त्यांच्या मते सरकारच्या धोरणांमुळेच देशात गॅसची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम थेट सामान्य जनतेवर होत आहे. पटोले म्हणाले की, सरकारने परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर
विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चित्रा वाघ यांनी गॅस टंचाईच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचा दावा केला. गॅस बुकिंग प्रक्रिया नियमित सुरू असून पुरवठा सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर हसन मुश्रीफ यांनीही गॅसचा तुटवडा निर्माण होऊ देणार नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे सांगितले.
विधानभवन परिसरात राजकीय आरोप-प्रत्यारोप
गॅस सिलिंडरच्या मुद्द्यावरून विधानभवन परिसरात मोठा राजकीय वाद रंगला. विरोधकांनी सरकारवर तीव्र आरोप करत घोषणाबाजी केली, तर सत्ताधाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावत पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला. दरम्यान, गॅस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवस हा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

