(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील ओरी आंबेवाडी येथील एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.०६ मे २०२६) घडली. गेल्या काही वर्षांपासून अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त असलेल्या या ज्येष्ठावर उपचार सुरू होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम पांडुरंग गराटे (वय ७४, रा. ओरी आंबेवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते.
दि. ६ मे रोजी सकाळी नेहमीप्रमाणे औषधे घेतल्यानंतर त्यांनी दुपारचे जेवण केले व घरी विश्रांती घेत होते. मात्र दुपारी सुमारे दोनच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सायंकाळी ७.५० वाजता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

