(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक हालचालींना गती दिली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी शहरात रूट मार्चसह वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत भव्य रूट मार्च काढण्यात आला. टराज नगर मरकज परिसरातून सुरू झालेला हा मार्च पैजाने अत्तार मदरसा, श्रीराम चौक, कदमवाडी, कीर्ती नगर, जामा मशीद, अलिशान कॉर्नर, क्रांतीनगर मार्गे पुन्हा राज नगर मरकज मैदानात समारोपाला पोहोचला.
या रूट मार्चमध्ये 5 पोलीस अधिकारी, 10 पोलीस अंमलदार, 1 एसआरपीएफ पथक, 70 पोलीस जवान आणि 66 होमगार्ड सहभागी झाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांची वाढती उपस्थिती पाहून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसले. तत्पूर्वी, शहर पोलीस ठाणे हद्दीत वाहन तपासणी मोहीमही राबविण्यात आली. या मोहिमेत एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करत कर्कश आवाज करणारे ‘बदल केलेले’ मॉडिफाइड सायलेन्सर जप्त करण्यात आले. वाहनचालकाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई नोंदविण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी रत्नागिरी पोलिसांची ही हालचाल महत्त्वाची ठरत असून, पुढील काळातही अशाच प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.

