(नागपूर / वृत्तसंस्था)
नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. दिघोरी परिसरातील एका खोलीत ती अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा असून हातावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय निर्भय उर्फ आकाश पाखरे याला अटक केली आहे.
या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलीला नेमका कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीविरुद्ध अपहरणासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून झाली होती ओळख
पोलीस उपायुक्त सुश्मिता राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुलीची सुमारे तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू होता. यापूर्वीही त्यांच्या भेटीगाठी झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 2 ऑगस्ट रोजी आरोपीने मुलीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर मुलगी बेपत्ता झाली.
‘मैत्रिणीकडे जाते’ सांगून घराबाहेर पडली
2 ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत मुलगी मोबाईलवरून आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. आपण मैत्रिणीकडे असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, रात्री अचानक तिचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. हुडकेश्वर पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाला सुरुवात केली.
मोबाईल लोकेशनने दिला महत्त्वाचा धागा
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी आणि अल्पवयीन मुलगी दिघोरी परिसरात असल्याचा अंदाज घेतला. त्यानंतर पोलिसांनी या परिसरात सूक्ष्म पद्धतीने शोधमोहीम सुरू केली. या तपासादरम्यान ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीतून मुलीला ठेवण्यात आलेल्या खोलीचा अचूक पत्ता आणि आरोपीशी संबंधित महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
दरवाजा आतून बंद; पोलिसांनी तोडून केला प्रवेश
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. खोलीत अल्पवयीन मुलगी अत्यंत गंभीर आणि जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने काही तासांपासून मुलीला मारहाण केल्याचा संशय आहे. मुलीला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील आरोपी नागपुरात खोलीपर्यंत कसा पोहोचला?
पोलिसांनी निर्भय उर्फ आकाश पाखरे याला अटक केली आहे. आरोपी हा ठाणे येथील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. नागपुरात त्याची स्थानिक ओळख नसताना त्याला दिघोरी परिसरात खोली कशी मिळाली, याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि इतर साहित्य आरोपी ठाण्याहून सोबत घेऊन आला होता की नागपुरात त्याने ते खरेदी केले, याचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपी १९ वर्षीय युवक ठाण्यातील डॉक्टरचा मुलगा आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्याच्या गंभीर कलमांखाली आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने इन्स्टाग्रामवर बनावट ओळख तयार केली होती. त्याने इन्स्टाग्राम आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पीडितेशी मैत्री केली. तो गेल्या वर्षी दोनदा नागपूरला आला होता आणि मुलीला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने तिच्या कुटुंबाबद्दल माहिती गोळा करत होता. तो 1 ऑगस्ट रोजी नागपूरला गेला होता.
विशेष म्हणजे, मुलीचे अपहरण केल्यानंतर आरोपीने तिच्या पालकांना ती सुरक्षित असल्याचे सांगण्यासाठी तिच्यावर फोन करण्याचा दबाव टाकला. मात्र, याच फोन कॉलमुळे पोलिसांना मुलीचे नेमके ठिकाण शोधण्यात महत्त्वाचा धागा मिळाला. तपासादरम्यान पोलिसांनी हुडकेश्वरमधील एका फ्लॅटमध्ये जेवण पोहोचवणाऱ्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी बॉयचा माग काढला. त्याच्या हालचालींचा तपास करत पोलीस संबंधित फ्लॅटपर्यंत पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून आत प्रवेश केला आणि मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोबाईल डेटा, CCTV आणि डिजिटल संवादाची तपासणी
या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करण्यासाठी पोलिसांनी मोबाईल डेटा, CCTV फुटेज, डिजिटल संवाद आणि अन्य तांत्रिक पुरावे तपासले आहेत. आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यातील संपर्क, त्यांच्या हालचाली तसेच घटनाक्रमातील इतर महत्त्वाचे दुवे तपासले जात आहेत. आरोपीच्या संपर्कात आणखी कोणी होते का? मुलीला दिघोरीतील खोलीत नेण्यामागे नेमका उद्देश काय होता? गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करत आहेत.

