(चिपळूण / प्रतिनिधी)
“छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांसारखे राष्ट्रपुरुष हे केवळ घोषणा देण्यासाठी किंवा डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाहीत. त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास करून ते आचरणात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. राष्ट्रपुरुषांचे विचार प्रत्यक्ष जीवनात रुजल्याशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही,” असे परखड प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी सायंकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित ‘राष्ट्रपुरुषांचा आदर्श आणि नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाला चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह खचाखच भरले होते.
यावेळी माजी मंत्री तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करशेठ जाधव, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजाभाऊ पाटणकर, रमण डांगे, समीर जानवलकर, नित्यानंद भागवत, शेखर सावले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. बानगुडे पाटील यांनी आपल्या खास खुमासदार आणि ओघवत्या शैलीत तरुण पिढीसमोरील आव्हानांवर भाष्य केले. “आज भारत महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहे; मात्र अनेक तरुण मोबाईल गेम, रील्स आणि सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर ज्ञान, कौशल्य आणि विचार समृद्ध करण्यासाठी झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नात्याचा संदर्भ देताना त्यांनी परस्पर सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. “टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी दिली, तर गांधीजींनी त्यांना ‘गुरुदेव’ म्हणून संबोधले. मतभेद असले तरी परस्पर आदर जपणे ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे,” असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टीपूर्ण नियोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड अभ्यास, भगतसिंगांचा राष्ट्रासाठीचा त्याग आणि महात्मा गांधींचा सत्य-अहिंसेचा मार्ग यांचा उल्लेख करत त्यांनी तरुणांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “राष्ट्रपुरुषांचे फोटो लावून किंवा सोशल मीडियावर स्टेटस ठेवून समाज बदलत नाही; त्यांच्या विचारांचे आचरणातूनच परिवर्तन घडते,” असे ते म्हणाले.
तरुणांनी केवळ नोकरी आणि पैशांच्या मागे न धावता समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासावी, असे सांगताना त्यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “मोबाईलच्या पडद्यामागील आभासी जगातून बाहेर पडा, ग्रंथ वाचा, इतिहास समजून घ्या आणि देशाच्या प्रश्नांचा अभ्यास करा. विचारवंत पिढी घडली तरच देश सक्षम बनेल,” असे आवाहन त्यांनी केले.
देशाची संस्कृती, परंपरा आणि संविधान यांचा अभिमान बाळगत राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याची जबाबदारीही तरुणांवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न आज होत आहे. मात्र राष्ट्रपुरुषांनी नेहमी माणुसकी, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला. तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
प्रा. बानगुडे पाटील यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांकडून वारंवार टाळ्यांचा कडकडाट होत होता. कार्यक्रमानंतर अनेक युवकांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या विचारांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. नित्यानंद भागवत यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हॉटेल व्यावसायिक प्रकाश देशमुख यांनी स्वीकारले होते.

