(रत्नागिरी)
येथील सुप्रसिद्ध उज्ज्वला कॉमर्स क्लासेसचे संस्थापक व रत्नागिरी शहरातील बहुसंख्य सीएंचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक बाळकृष्ण जयराम हळबे (वय ८८) यांचे आज पुणे येथे निधन झाले..
त्यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला, मुलगा श्रीरंग व तीन कन्या असा परिवार आहे. बाळकृष्ण हळबे सरांना शिकवण्याची प्रचंड आवड असल्याने १९८० मध्ये दुबईतून नोकरी सोडून वयाच्या ४२ व्या वर्षी क्लासेस सुरू केले. सुरवातीला वेंगुर्ला, राजापूर व टिळक आळीत कॉमर्सचे क्लास सुरू केले. नंतर मात्र रत्नागिरीत ते स्थायिक झाले.
हळबे सरांचा भरपूर शिष्य वर्ग आहे. अकौंटन्सी विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थी हळबे सरांकडे शिकले आहेत. त्यांनी पैशांअभावी कोणाचे शिक्षण अडवले नाही. विद्यार्थीप्रिय शिक्षक, मितभाषी अशी त्यांची ख्याती होती. रत्नागिरी अनुषंगाने कोकणातील बहुसंख्य वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे ते गुरु होते. रत्नागिरीत त्यांनी २८ वर्षे क्लास घेतले. वयोमानानुसार निवृत्ती घेत त्यांनी उज्ज्वला क्लासेसची धुरा त्यांचे शिष्य पुरुषोत्तम पाध्ये यांच्याकडे दिली. श्री. पाध्ये यांनी उज्ज्वला क्लासेसच्या वतीने हळबे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.