(चिपळूण)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित पूज्य सानेगुरुजी जिल्हास्तरीय कथाकथन व वकृत्व स्पर्धा बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे येथे पार पडल्या.
या स्पर्धेत खेर्डी–चिंचघरी सती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कथाकथन सादर करत उल्लेखनीय यश मिळवले. प्राथमिक गटात कु. वेदांत महेंद्र महाडिक याने द्वितीय क्रमांक पटकावला, तर उच्च माध्यमिक गटात कु. भूमी नितीन कोलगे हिने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
सानेगुरुजी यांच्या जीवन व कार्यावर आधारित कथांचे सादरीकरण करताना दोन्ही विद्यार्थ्यांनी आवाजातील योग्य चढउतार, भावपूर्ण अभिव्यक्ती आणि आशयपूर्ण मांडणीद्वारे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कथांमधून नैतिक मूल्ये, समाजभान आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अनंत डिके उपस्थित होते. या यशामुळे शाळा तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवी ओळख मिळाली आहे.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

