(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे कोपरखरी परिसरात महावितरणच्या रोहित्रावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली असली तरी, या निमित्ताने महावितरणचा कमालीचा हलगर्जीपणा देखील उघड झाला आहे. २४ नोव्हेंबर २०२४ पासून ते ४ मे २०२६ अशा तब्बल दीड-दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळात हे निकामी रोहित्र उघड्यावर का पडून होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
फुणगूस खाडिभागातील मांजरे(कोपरखरी) येथे महावितरणचे २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत होते. नियमानुसार, एखादे रोहित्र निकामी झाले आणि त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवले की, जुने निकामी झालेले साहित्य तातडीने संबंधित विभागाच्या ताब्यात किंवा सुरक्षित गोदामात जमा करणे आवश्यक असते. मात्र, मांजरे परिसरात हे रोहित्र कोणतीही सुरक्षा नसताना बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले होते. या दीड वर्षाच्या काळात हे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी ज्यांची होती, त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केला असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी केवळ एकच रोहित्र बेवारस नव्हते, तर दोन रोहित्र खांबावरून खाली उतरवून जमिनीवर ठेवण्यात आले होते आणि एक निकामी रोहित्र आजही खांबावर तशाच स्थितीत लटकलेले आहे. महावितरणच्या या अशा कारभारामुळेच चोरट्यांचे फावले असून त्यांनी ३५ किलो तांब्याचे वायडिंग शिताफीने लंपास केले. यामुळे शासनाचे ३५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विद्युत विभागाच्या नियमित तपासणीत ही चोरी उघडकीस आल्यानंतर आता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या चोरीला केवळ चोरटेच जबाबदार नसून, इतका प्रदीर्घ काळ सरकारी मालमत्ता उघड्यावर सोडून देणारे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी तितकेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. ज्यांनी हे रोहित्र सुरक्षित ठिकाणी हलवले नाही, त्यांच्यावर कारवाई होणार का आणि या नुकसानीची भरपाई कोणाकडून केली जाणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, महावितरणच्या या ढिसाळ नियोजनामुळे शासनाच्या तिजोरीला बसलेल्या या फटक्याला जबाबदार कोण, अशी चर्चा आता संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात रंगली आहे.

