( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मंथन आर्ट स्कूल, रत्नागिरीच्या मंचावर दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सुप्रसिध्द चित्रकार विशाल वाडये यांची ‘ ए आय सोबत डिझाईन थिंकिंग’ विषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. विशाल वाडये यांनी त्यांच्या अनुभवातून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत रत्नागिरीतील ४० विद्यार्थी सहभागी झाले होते.
ए आय टुल म्हणून वापरायचे असले तरी त्याला कमांड देण्यासाठी स्वतःच्याच कल्पना असणे आवश्यक आहे. त्यासंबंधी मार्गदर्शन करताना अध्यात्मापासून समाजकार्यापर्यंत , चालूघडामोडीपासून फिल्ममेकींगपर्यंत सर्वच बाबींचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे, असे वाडये यांनी विवेचन केले. सृजनशीलतेसाठी विचारांची घेवाण-देवाण असणे खूप गरजेचे आहे.ए आय कोणासाठी, ए आय कशासाठी, ए आय चा वापर कसा करावा व त्यासाठी कोणते अँप्स वापरावे याची पूर्ण माहिती या वर्कशाॅॅपमध्ये दिली गेली. मेटा अँपच्या मदतीने विषयाला धरून नवनवीन व्हिज्युअल कसे तयार करावे याबाबत आलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ए आय आल्यामुळे माणसांची गरज संपली नसून ते वापरण्यासाठी त्यांच्या विचारांना चालना देण्याची गरज आहे.
हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगकर्मी सुहासजी भोळे यांच्या शुभहस्ते विशाल वाडये यांचा शाल,रोपटे आणि मंथनची डायरी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाखाप्रमुख प्रा.संदेश पालये, प्रा.प्रतिक्षा पांचाळ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.