(रत्नागिरी / वार्ताहर)
श्रावणाच्या रिमझिम सरी, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी दुमदुमलेले रत्नागिरीचे रस्ते… ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी आज शहरातून निघालेल्या भव्य तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचा जागर केला. सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेली ही रॅली रत्नागिरीच्या राष्ट्रप्रेमाची आणि एकजुटीची साक्ष देणारी ठरली.
मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा शुभारंभ झाला. पोलीस बँड पथकाने सादर केलेले ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि राज्यगीत यामुळे वातावरण भारावून गेले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
रॅली शासकीय रुग्णालयाजवळ पोहोचल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या तालावर मार्गक्रमण करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली. येथे पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीच्या परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले, “रत्नागिरीची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आज सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून रत्नागिरीकर ज्या एकजुटीने तिरंग्याखाली उभे राहिले आहेत, ते संविधानाचा आदर आणि देशप्रेमाचे ज्वलंत उदाहरण आहे. संविधानाचा आदर कसा करावा, हे संपूर्ण देशाने रत्नागिरीकडून शिकावे.”
सैनिकांच्या सन्मानार्थ महत्त्वपूर्ण घोषणा
देशाच्या सीमेवर खडा पहारा देणाऱ्या जवानांसह निवृत्तीनंतर समाजात योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. पुढील वर्षापासून १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
तसेच, पुढील वर्षी १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीपूर्वी रत्नागिरीत भव्य ‘सैनिक उद्यान’ उभारण्यात येईल. त्याचबरोबर ‘जिल्हा सैनिक भवन’ उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या वास्तू म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या तमाम सैनिकांना रत्नागिरीची मानवंदना ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील वर्षीची तिरंगा रॅली तब्बल एक लाख नागरिकांच्या उपस्थितीत काढण्याचा संकल्पही डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
जीव धोक्यात घालून प्राण वाचविणाऱ्या युवकांचा सन्मान
स्वतःचा जीव धोक्यात घालून तन्वयचे प्राण वाचविणाऱ्या आयुष कामेरकर, अनुप कामेरकर, सार्थक जठार, भरत जठार आणि आयुष गांधी या धाडसी युवकांचा यावेळी मानाचा तिरंगा देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
विविध शाळांमधील विद्यार्थी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, माजी सैनिक आणि हजारो नागरिकांच्या सहभागामुळे रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तिरंगा हातात घेऊन राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि भारतमातेच्या जयघोषात सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांनी देशप्रेमाची भावना कृतीतून व्यक्त केली.
ही तिरंगा रॅली केवळ एक कार्यक्रम न राहता सैनिकांप्रती कृतज्ञता, संविधानाप्रती आदर आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणारा संस्मरणीय सोहळा ठरली. रत्नागिरीच्या रस्त्यांवर फडकलेला तिरंगा आणि नागरिकांच्या मनात जागलेली राष्ट्रभक्तीची ज्योत हा दिवस दीर्घकाळ स्मरणात राहील.

