(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू आणि पाच वेळा प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत त्याने पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातील २३ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम देत असल्याचे सांगितले. ४१ वर्षीय रोनाल्डोने १४६ गोलसह पोर्तुगालकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने देशाचे २३२ सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून, २०१६ मध्ये पोर्तुगालला युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पोर्तुगालच्या जनतेला उद्देशून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये रोनाल्डोने आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय संघाची ७ क्रमांकाची जर्सी आता नव्या पिढीतील खेळाडूकडे सोपवण्याची वेळ आल्याचे त्याने सांगितले. ही जर्सी त्याने कधीही केवळ स्वतःची मानली नाही. गेली २३ वर्षे ती परिधान करण्याची, तिच्याशी निगडित जबाबदारी पार पाडण्याची आणि जगभरातील मैदानांवर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे त्याने नमूद केले. हा निर्णय घेणे सोपे नाही, मात्र काही निर्णय बुद्धीपेक्षा मनाच्या भावनेतून घेतले पाहिजेत, असे रोनाल्डो म्हणाला. ऑगस्ट २००३ मध्ये सुरू झालेला प्रवास आता थांबवत असल्याचे सांगताना त्याने या कारकिर्दीने आपले आयुष्य कायमचे बदलून टाकल्याची भावना व्यक्त केली.
राष्ट्रीय संघासोबत मैदानावर खेळण्याचा प्रवास संपत असला, तरी पोर्तुगालशी असलेले नाते कायम राहील, असेही त्याने स्पष्ट केले. देशाला मिळणाऱ्या प्रत्येक विजयात, आनंदात, दुःखात आणि उत्सवात आपण सहभागी राहू, असे त्याने सांगितले. जगातील सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली; मात्र जगातील सर्वोत्तम देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान हाच आपला सर्वांत मोठा विजय असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
या २३ वर्षांच्या प्रवासात विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल पोर्तुगालच्या जनतेचे आभार मानताना मदेरामधील लहानपणीच्या आठवणींनाही त्याने उजाळा दिला. फुटबॉलच्या मागे धावताना पाहिलेले स्वप्न प्रत्यक्ष जगण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली. ७ क्रमांकाची जर्सी आता दुसऱ्या खेळाडूकडे जाणार असली, तरी ती परिधान केल्याचा अभिमान कायम सोबत राहील आणि पोर्तुगाल आपल्या हृदयात सदैव असेल, असे रोनाल्डोने म्हटले.
दरम्यान, पोर्तुगालचे प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर रोनाल्डोच्या निवृत्तीच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली होती. मागील आंतरराष्ट्रीय ब्रेकदरम्यान या वादाला सुरुवात झाली. ओस्लो येथे झालेल्या ‘नेशन्स लीग’ सामन्यात पोर्तुगालने नॉर्वेचा २-१ असा पराभव केला होता. मात्र, या सामन्यात रोनाल्डोला खेळण्याची संधी मिळाली नाही. सामना संपल्यानंतर तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. मैदानावर उपस्थित राहून संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठीही तो सहकाऱ्यांसोबत सहभागी झाला नाही. या प्रकारानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि दंडही ठोठावण्यात आला होता.
त्यानंतर रोनाल्डोने एका विस्तृत निवेदनातून संघ सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली होती. प्रशिक्षक जॉर्ज जीझस यांनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप त्याने केला होता. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले जाईल, असे आश्वासन मिळाल्यामुळे आपण वॉर्म-अपही सुरू केला होता; मात्र ऐनवेळी प्रशिक्षकांनी निर्णय बदलल्याचे रोनाल्डोने सांगितले होते. या मतभेदांमुळेच त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन दशकांहून अधिक काळ गाजली. २००३ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने पोर्तुगालकडून पदार्पण केले. त्यानंतर तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला आणि पुढे त्याच्याकडे संघाचे नेतृत्वही आले. त्याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने ‘युरो २०१६’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याशिवाय दोन ‘यूईएफए नेशन्स लीग’ विजेतेपदांमध्येही त्याने महत्त्वाचे योगदान दिले.
फिफा विश्वचषकाच्या सहा आवृत्त्यांमध्ये पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. त्याने २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ या विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे. त्याचा यावर्षीचा विश्वचषक प्रवास ‘राउंड ऑफ १६’ फेरीत स्पेनविरुद्ध १-० अशा पराभवाने संपला. वैयक्तिक कामगिरीचे अनेक विक्रम आणि प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्द नावावर असूनही विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न मात्र त्याला पूर्ण करता आले नाही.


