रघुवीर मिठाईचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना या मिठाईच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. ‘स्वर्ण शंख’ तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे मामरा बदाम, पिसोरी पिस्ता आणि शुद्ध केशर यांचा वापर करण्यात आला आहे. या दर्जेदार घटकांसोबत २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला असून, त्यामुळे मिठाईला आकर्षक सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. राजस्थानच्या कुशल कारागिरांनी तिला शंखाचा देखणा आकार दिला आहे. त्यामुळे चव, दर्जा आणि कलाकुसर यांचा संगम असलेली ही मिठाई इतर मिठाईंपेक्षा वेगळी ठरत असल्याचे पोपट यांनी सांगितले.
‘स्वर्ण शंख’ या नावामागेही विशेष धार्मिक संकल्पना आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असून, देवी महालक्ष्मीला अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादाच्या कल्पनेतून या मिठाईची निर्मिती करण्यात आली आहे. शंख हे मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच संकल्पनेतून या मिठाईला ‘स्वर्ण शंख’ असे नाव देण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त प्रियजनांना काहीतरी वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण भेट देऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मिठाई आकर्षण ठरत आहे.
सोन्याचा वर्ख वापरण्यात येत असल्याने त्याची शुद्धता आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. मिठाईसाठी वापरण्यात येणाऱ्या २४ कॅरेट सोन्याच्या वर्खाची प्रमाणित प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच त्याचा वापर केला जात असल्याची माहिती चंद्रकांत पोपट यांनी दिली.
रघुवीर स्वीट अँड नमकीनकडून गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईची निर्मिती केली जाते. गतवर्षी अशाच प्रकारच्या मिठाईला इंग्लंड आणि अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही ‘स्वर्ण शंख’ मिठाई परदेशात पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात आणि राजस्थानमधूनही या मिठाईला मागणी येत असल्याचे पोपट यांनी सांगितले. याशिवाय ग्राहकांसाठी शुगर फ्री मिठाईचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३०५ रुपयांपासून मिक्स मिठाईचे बॉक्स, तसेच ५ हजार रुपयांपर्यंतचे आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवाळीच्या भेटवस्तूंसाठी ग्राहकांना विविध पर्याय मिळत आहेत.
दरम्यान, दिवाळीच्या काळात मिठाई आणि खव्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असल्याने नागरिकांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. दुकानांमध्ये दोन किंवा तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवलेली खव्याची मिठाई खरेदी करू नये. तसेच आवश्यक तेवढीच मिठाई खरेदी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नामांकित आणि योग्य लेबल असलेल्या दुकानांमधूनच मिठाई व खवा खरेदी करण्याचे आवाहन केले. भेसळ किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास एफडीएला कळवावे. संबंधित प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिठाई विक्रेत्यांनी आणि दुकानचालकांनीही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. अधिक प्रमाणात रंग वापरलेली किंवा भडक रंगांची मिठाई खरेदी करणे टाळावे. मिठाई किंवा खव्याच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख नमूद असेल, तरच अशी उत्पादने खरेदी करावीत, असे त्यांनी सुचवले.
सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाईच्या खरेदीबाबतही त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. चांदीचा वर्ख हातात घेतल्यानंतर विरघळत असेल, तर तो योग्य असल्याचे समजावे; मात्र त्याची फॉइल तयार होत असेल, तर तो चांदीचा वर्ख नसून अॅल्युमिनियम फॉइल असल्याचे ओळखावे, असे मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख असलेली मिठाई खरेदी करताना त्याच्या गुणवत्तेची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मिठाईतील भेसळ कशी ओळखाल? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
दिवाळीच्या काळात मिठाई आणि खव्याची खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. मिठाई खरेदी करताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.
-
ताजी मिठाई खरेदी करा : दुकानात दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवलेली मिठाई किंवा खवा खरेदी करणे टाळा.
-
नामांकित दुकानांना प्राधान्य द्या : शक्यतो विश्वासार्ह आणि योग्य लेबल असलेल्या दुकानांमधूनच मिठाई खरेदी करा.
-
उत्पादनाची तारीख तपासा : मिठाई किंवा खव्याच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख नमूद आहे की नाही, याची खात्री करा.
-
गरजेपुरतीच खरेदी करा : मिठाई आवश्यक तेवढीच खरेदी करा, जेणेकरून ती जास्त काळ साठवून ठेवण्याची वेळ येणार नाही.
-
भेसळीचा संशय असल्यास तक्रार करा : मिठाई किंवा खव्यामध्ये भेसळ असल्याचे आढळल्यास अथवा संशय निर्माण झाल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवा.
नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित प्रकरणांत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.


