(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे श्री देवी कालेश्वरी मूर्तीची भव्य आणि भक्तिमय मिरवणूक बुधवारी, 6 मे रोजी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. देवळे वाणीवाडी ते देवळे बाजारपेठेतील कालेश्वरी मंदिर असा सुमारे दोन तासांचा हा सोहळा पार पडला.
श्री देवी कालेश्वरीची मूर्ती उडपी येथून आणून प्रथम वाणीवाडी येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर वाणीवाडी ते कालेश्वरी मंदिर अशी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत भगवे निशाण हातात घेऊन भगवे व पांढरे पोशाख परिधान केलेले महिला, पुरुष, युवक तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे चार हजार भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावल्याने संपूर्ण देवळे गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान, मंदिरात होमहवन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे धार्मिक उत्सव 8 मेपर्यंत सुरू राहणार आहेत. 8 मे रोजी श्री देवी कालेश्वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

