(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावरील देवळे फाटा परिसरात पहाटे झालेल्या अपघातात भरधाव अल्टो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन रिक्षांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. या प्रकरणी बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील अनुप तुकाराम पाटील हे त्यांची रिक्षा (MH-08 AQ-3363) घेऊन गणपतीपुळेच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत ओळखीचे नितीन सुरेश हुलवाने हे देखील अंगारकी संकष्टी निमित्त गणपतीपुळे येथे जात होते. दरम्यान, देवळे फाटा येथील ओपन टेरेस हॉटेलजवळ नितीन हुलवाने यांची रिक्षा (MH-10 A-3611) अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. मदतीसाठी अनुप पाटील यांनीही त्यांची रिक्षा पुढे थांबवली. दोघे मिळून बंद पडलेल्या रिक्षेची दुरुस्ती करत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या भरधाव अल्टो कारने या दोन्ही रिक्षांना जोरदार धडक दिली.
अल्टो कार चालक अनिल शिवाजीराव पाटील (रा. येळावी, ता. तासगाव, जि. सांगली) याने वाहन अतीवेगात आणि निष्काळजीपणे चालवत प्रथम नितीन हुलवाने यांच्या रिक्षेला मागून धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षा पलटी झाली. त्यानंतर कार पुढे जाऊन अनुप पाटील यांच्या रिक्षालाही धडकली. या अपघातात रिक्षा दुरुस्तीचे काम करणारे मजीर नजीर बुटलेर तसेच बॅटरीच्या प्रकाशात मदत करणारे आनंदा विजय अडसुळे, दोघेही रा. सांगली, जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
याप्रकरणी अनुप तुकाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

