(संगमेश्वर / एजाज पटेल)
“सरकार की आमद… मरहबा!”, “आका की आमद… मरहबा!”, “मर्हबा या मुस्तफा… मरहबा!” आणि “पत्ती पत्ती फूल फूल… या रसूल या रसूल!” अशा घोषणांनी फुणगूस परिसर दुमदुमून गेला. रहमतुल लिल आलमीन पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मुबारक जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्सव फुणगूस येथे भक्तिभाव, उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.
उत्सवानिमित्त संपूर्ण फुणगूस गावाला आकर्षक विद्युत रोषणाई, झेंडे आणि विविध सजावटीने नटविण्यात आले होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. ठिकठिकाणी नागरिकांनी एकमेकांना मिठी मारून तसेच गुलाबाची फुले देऊन ईद मिलादच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे परिसरात धार्मिक उत्साहासोबतच आपुलकी आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फुणगूस जमातचे अध्यक्ष मुनीर अ. रहिमान खान तसेच जमातच्या सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात हजरत शेख जाहीर शेख पीर दर्गा येथून झाली. दर्गा शरीफ येथे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पवित्र ‘मुये मुबारक’चे भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले.
यानंतर नाते शरीफचे पठण करत फुणगूस चौक, मुख्य बाजारपेठ आणि परिसरातील विविध भागांतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. “देख के जिनका जलवा झूमे अरशे आझम…”, “मुबारक हो मुस्तफा तशरीफ लाये…” आणि “निसार तेरी चहल पहल पर हजारो ईद ए रबी उल अव्वल…” अशा धार्मिक घोषणांनी आणि पठणाने वातावरण भक्तिमय झाले होते.
मिरवणूक फुणगूस चौकात पोहोचल्यावर सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. कोंडये गावचे सरपंच महेश देसाई यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. “फुणगूस आणि परिसरातील हा पारंपरिक आनंदाचा उत्सव सर्वांना एकत्र आणणारा आहे. या आनंदोत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा देण्यासाठी मी खास आलो आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महेश देसाई यांनी मिरवणुकीतील सहभागींसाठी अल्पोपाहार आणि जिलेबीची व्यवस्था केली होती. तसेच हनिफ उमर खान यांनी नागरिकांसाठी पाणी आणि कोल्ड्रिंक्सची व्यवस्था केली.
फुणगूस येथील ज्येष्ठ नागरिक भाई गुरव यांनी हिंदीतून सामाजिक एकतेचा संदेश दिला. “हम सब मिलकर सारे त्योहार मनाते हैं, यही हमारा असली भाईचारा है; और ये भाईचारा ऐसा ही सदियों तक चलता रहेगा,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या संदेशाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
यानंतर मिरवणूक शाही मशिदीत पोहोचली. तेथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नात कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. मुहमद मुजावर, अब्दुल्ला मुजावर, ताहा मुजावर, हसनैन खान, आलिया खान, हिफझा खान, युसूफ खान आणि रहमान खान यांनी पैगंबर साहेबांच्या शानमध्ये नाते शरीफ सादर केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे मशिदीतील वातावरण भक्तिमय झाले.
मुख्य धार्मिक कार्यक्रमात इमाम मौलाना अजहर रझा यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. पैगंबर हजरत मोहम्मद हे संपूर्ण मानवजातीसाठी ‘रहमतुल लिल आलमीन’ म्हणून आले. त्यांनी मानवाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञान, ईमान आणि नैतिकतेच्या प्रकाशाकडे नेले, असे त्यांनी सांगितले.
प्रेम, करुणा, क्षमा, सत्य, प्रामाणिकपणा, आई-वडिलांचा आदर, महिलांचा सन्मान तसेच अनाथ आणि गरजूंच्या मदतीचा संदेश पैगंबरांनी दिला असल्याचे मौलाना अजहर रझा यांनी स्पष्ट केले. समाजात शांतता, सुसंवाद आणि भाईचारा टिकवण्यासाठी पैगंबरांच्या सुन्नत व उच्च नैतिक मूल्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोंडीवरे मदरशाचे इमाम मौलाना अहमद रझा यांनीही इस्लाममधील नैतिक मूल्ये आणि गरीब-गरजूंच्या मदतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
धार्मिक कार्यक्रमाच्या उत्तरार्धात इमाम मौलाना अजहर रझा यांनी आका-ए-दो जहाँ यांच्या बारगाहात सलातो-सलाम सादर केला. यावेळी उपस्थितांनी आदराने उभे राहून सलामाचे पठण केले. त्यानंतर देश, राज्य आणि फुणगूस परिसरात शांतता, सुख-समृद्धी, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली. उपस्थितांनी ‘आमीन’चा गजर केला.
दिवसभर भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा झाल्यानंतर रात्री दर्गा परिसरात लंगर-ए-रसूलीचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी लंगरचा लाभ घेतला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देत फुणगूस येथील ईद मिलाद उत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.

