( अहिल्यानगर )
जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घर बांधण्यासाठी माहेरहून 4 लाख रुपये आणण्याच्या सततच्या दबावाला आणि छळाला कंटाळून 23 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एकरुखे गावात घडली. प्रिया शुभम ढगे असे मृत विवाहितेचे नाव असून, या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासाठी पैशांची मागणी, सततचा छळ
प्रिया ढगे हिचा विवाह 17 फेब्रुवारी 2022 रोजी राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शुभम राजेंद्र ढगे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. मात्र, नंतर घर बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये आणण्याचा तगादा प्रियाकडे लावण्यात येत होता. फिर्यादीनुसार, पती शुभम ढगे, सासरे राजेंद्र आबासाहेब ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांनी पैशांसाठी प्रियाला वारंवार शिवीगाळ, मारहाण तसेच उपाशीपोटी ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ केला. या त्रासामुळे प्रिया काही दिवसांपासून माहेरी एकरुखे येथे राहत होती. प्रियाला माहेरी सोडताना “पैसे घेतल्याशिवाय परत येऊ नको” अशी धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. याशिवाय तिची लहान मुलगी श्रेया हिलाही सासरच्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतल्याने प्रिया मानसिक तणावात होती.
आत्महत्येपूर्वीचा व्हॉट्सॲप मेसेज आला समोर
3 मे 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रियाने आपल्या माहेरच्या घराजवळ आत्महत्या केली. तिला तातडीने शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियाच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल तपासण्यात आला असता तिने स्वतःच्याच नंबरवर एक भावनिक व्हॉट्सॲप मेसेज टाइप करून ठेवल्याचे समोर आले.
यामध्ये तिनं आपल्या मुलीची काळजी घेण्यास सांगितलं असून, ताई, काकी, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता मला काहीच नको आहे. मी खूप सहन केलं आहे. मला माझी मुलगी खूप आठवते, पण ती आता माझ्याकडे येणार नाही. माझ्या नवऱ्यावर, शुभमवर मी खूप प्रेम केलं, पण त्यानं कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही. तो फक्त त्याच्या कुटुंबावरच प्रेम करत होता. आज जे काही झाले आहे, त्याला माझे सासरचे लोकच जबाबदार आहेत. आमच्यात सतत भांडणं होत होती. ताई, कृपया मुलीची काळजी घे. मी तिला तुझ्यावर सोपवून जाते आहे. आता मी या जगात राहणार नाही. पण शुभमवर माझे प्रेम कायम राहील. माझी एकच इच्छा आहे की, शुभमला विचार की मला का सोडून गेला. एक महिना झाला, मी मुलीला पाहिलंही नाही. मला तिची खूप आठवण येते. मला माफ कर, तुझ्यासाठी मी काहीच करू शकले नाही. आज मी सगळं सांगत आहे. चूक माझी नाही. मी कोणतेही पैसे चोरले नाहीत आणि अक्काचेही पैसे घेतले नाहीत. मला नोकरी करायची होती, पण घरच्यांनी परवानगी दिली नाही. आता मला कोणालाही त्रास द्यायचा नाही. शुभमला सांग, मी आता तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जात आहे. माझी शेवटची इच्छा आहे की मुलीची नीट काळजी घ्यावी. मला आता काहीच नको आहे. सॉरी. अशा भावना तिने या मेसेजमध्ये व्यक्त केल्या आहेत.
पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी प्रियाचे चुलते अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी पती शुभम राजेंद्र ढगे, सासरे राजेंद्र आबासाहेब ढगे आणि सासू प्रतिभा राजेंद्र ढगे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास राहाता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहेत.

