( मुंबई )
“माझं खोटं लेटरहेड वापरण्यात आलं. एवढंच नव्हे तर नवीन AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझा आवाज हुबेहुब तयार केला आणि तो वापरून ‘मी प्रसाद लाड बोलतोय’ म्हणत अधिकाऱ्यांना फोनवरून निधी वर्ग करण्याचे आदेशही दिले!” — अशी खळबळजनक माहिती विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात मांडली आणि एकच खळबळ उडवून दिली.
प्रसाद लाड यांनी पुढे सांगितले की, “रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून मला फोन आला. बीड जिल्ह्यातून कुणीतरी बनावट पत्रव्यवहार केला होता. त्या पत्रावर माझी खोटी सही होती आणि त्यात ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी बीडला वर्ग करण्याची विनंती होती. यामध्ये तब्बल ३६ कामांची यादी दिली होती आणि संबंधित निधीही वर्ग झाला होता.”
“मात्र, बीडमध्ये नुकतेच पदभार स्वीकारलेल्या डीपीओ अधिकाऱ्यांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी त्वरित मला संपर्क केला. मी जेव्हा त्या पत्राची प्रत मागवली, तेव्हा लक्षात आलं की, लेटरहेड बनावट असून माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आलेला आहे.”
या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रसाद लाड यांनी सभागृहात मागणी केली की, “या प्रकरणातील दोषींना कोणत्याही पक्षाचे असले तरी कठोरात कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी.”
“हे फक्त माझ्याबाबतीतच नाही, याआधी आमदार श्रीकांत भारतीय यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. हा काही छोटा विषय नाही — ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी असा बनावट पत्र आणि आवाजावरून वर्ग होतो, हे अतिशय धोकादायक आहे,” असे ते म्हणाले.
‘ओटीपी आधारित प्रणाली लागू करा’ — तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षेसाठी व्हावा
“सरकारने त्वरित नवे तंत्रज्ञान वापरून निधी वर्ग करण्यासाठी ओटीपी-आधारित प्रणाली लागू करावी. आमदारांकडून अधिकृत ओटीपी प्राप्त झाल्यानंतरच निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण व्हावी. यामुळे अशा बनावट व्यवहारांना आळा बसेल,” अशी शिफारस लाड यांनी सभागृहात केली. तसेच, “सरकारने आमदारांचे पीए, सहाय्यक यांच्यावर देखील लक्ष ठेवत पोलिस यंत्रणेला आवश्यक निर्देश द्यावेत,” अशी मागणीही त्यांनी केली.
सभापतींची दखल; शासनाला ठोस पावले उचलण्याचे निर्देश
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी शासनाने त्वरीत तपास करून या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. बनावट दस्तऐवज, खोटा आवाज, आणि AI च्या दुरुपयोगाचा हा प्रकार संपूर्ण राज्यासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

