(मुंबई)
आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत असून याकडे जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष लागले आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असल्याने त्याला “ब्लड मून” असेही म्हटले जाते. भारतासह अनेक देशांमध्ये हे ग्रहण पाहता येणार असून जागतिक स्तरावर ते अनेक तास चालेल.
चंद्रग्रहणावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र हळूहळू गडद लालसर रंगात बदलतो. हा बदल पाहण्यासाठी दुर्बीण किंवा लहान टेलिस्कोपचा उपयोग करता येतो. मात्र, ज्या भागांत ग्रहण प्रत्यक्ष दिसणार नाही किंवा बाहेर जाणे शक्य नसेल, तेथे घरात बसून मोबाइलवर थेट लाइव्ह स्ट्रीमद्वारेही हे दृश्य पाहता येणार आहे. NASA आणि ISROसह अनेक आंतरराष्ट्रीय वेधशाळा ऑनलाईन प्रक्षेपण करणार आहेत.
भारतामध्ये चंद्रग्रहण किती वाजता दिसणार?
जागतिक स्तरावर हे चंद्रग्रहण सुमारे साडेपाच तास चालेल. मात्र भारतात चंद्र क्षितिजाखाली असल्यामुळे संपूर्ण टप्पा दिसणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात हे ग्रहण संध्याकाळी 6:30 ते 6:48 दरम्यान म्हणजेच सुमारे 15 मिनिटे स्पष्टपणे पाहता येईल. काही राज्यांमध्ये दृश्य अधिक चांगले असण्याची शक्यता आहे.
चंद्रग्रहण कसे आणि का होते?
जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्रावर अंधुक लालसर छटा दिसू लागते. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशीच होते. मात्र चंद्राची कक्षा थोडी झुकलेली असल्याने प्रत्येक पौर्णिमेला ग्रहण होत नाही.
कुठल्या भागांत ग्रहण अधिक स्पष्ट दिसेल?
आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि पॅसिफिक प्रदेशात चंद्रग्रहण पूर्णपणे दिसण्याची शक्यता आहे. युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांत दृश्य मर्यादित राहील. भारतामध्ये विशेषतः आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचा पूर्व भाग येथे ग्रहण अधिक स्पष्ट दिसू शकते.
महाराष्ट्रातील शहरांमध्ये किती वेळ दिसेल?
ग्रहणाची समाप्ती सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात चंद्रोदयानंतर ते ६:४८ पर्यंतच ग्रहण दिसेल.
मुंबई -चंद्रोदय ६:४५; ग्रहण फक्त सुमारे ३ मिनिटे
पुणे – ६:४१; सुमारे ७ मिनिटे
नाशिक – ६:४०; सुमारे ८ मिनिटे
कोल्हापूर – ६:४०; सुमारे ८ मिनिटे
नागपूर – ६:१८; सुमारे ३० मिनिटे (सर्वाधिक वेळ)
सोलापूर – ६:३३; सुमारे १५ मिनिटे
रत्नागिरी – ६:४४; सुमारे ४ मिनिटे
छत्रपती संभाजीनगर – ६:३४; सुमारे १४ मिनिटे
यावरून दिसते की विदर्भातील भागात ग्रहण अधिक वेळ पाहता येईल, तर कोकण आणि मुंबई परिसरात ते अतिशय कमी वेळासाठीच दृश्य असेल.
मोबाइलवर चंद्रग्रहण लाईव्ह कसे पाहाल?
घरात बसून स्मार्टफोनवर चंद्रग्रहण पाहण्यासाठी:
- NASA आणि ISROसारख्या संस्थांचे अधिकृत YouTube चॅनेल
- जागतिक वेधशाळांचे लाइव्ह स्ट्रीम
- नामांकित न्यूज पोर्टल्सचे थेट प्रक्षेपण
यांच्या माध्यमातून तुम्ही ग्रहणाचा प्रत्येक टप्पा लाईव्ह पाहू शकता.
चंद्रग्रहण पाहताना काळजी घ्यावी लागते का?
चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे सुरक्षित मानले जाते. सूर्यग्रहणाप्रमाणे यासाठी विशेष फिल्टरची गरज नसते. तरीही, अभ्यासासाठी दुर्बीण किंवा टेलिस्कोप वापरताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते. आजचे चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी खास संधी आहे. भारतात वेळ मर्यादित असली तरी, प्रत्यक्ष किंवा लाईव्ह स्ट्रीमद्वारे ब्लड मून अनुभवण्याची संधी नक्कीच दवडू नका. खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक नैसर्गिक आणि सुरक्षित खगोलदृश्य असून ते साध्या डोळ्यांनी पाहण्यास कोणताही धोका नाही.

