( नागपूर )
नागपूर शहरातील सायबर पोलिस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 500 रुपयांच्या ऑनलाइन बेटिंग फसवणूक प्रकरणाच्या तपासादरम्यान खोटा आणि दिशाभूल करणारा अहवाल वरिष्ठांना सादर केल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी ही कठोर कारवाई केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर पोलिस आयुक्तालयाने सायबर विभागाची संपूर्ण जबाबदारी आयपीएस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्याकडे सोपवली आहे. त्याचबरोबर सायबर सेलच्या डीसीपी पदावरही बदल करण्यात आले आहेत.
आरोपीपर्यंत पोहोचूनही ‘सापडला नाही’चा अहवाल
सायबर पोलिसांकडे ऑनलाइन बेटिंग अॅपद्वारे 500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान बेटिंग अॅपचे धागेदोरे पुणे आणि मुंबईपर्यंत पोहोचले. पुण्यात गेलेल्या पथकाने संशयित एकांश जैन याच्याशी संपर्क साधून त्याला चौकशीची नोटीसही दिली होती. या तपासाची माहिती पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनाही देण्यात आली होती. त्यानंतर ते स्वतः पुण्यात पोहोचले. मुंबईतील पथकालाही पुण्यात बोलावण्यात आले होते. मात्र, नागपूरला परतल्यानंतर सादर करण्यात आलेल्या अधिकृत अहवालात “आरोपी मिळाला नाही” असे नमूद करण्यात आले. यामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले.
मुळात हा वाद एका मोठ्या सायबर गुन्ह्याच्या तपासातून पुढे आला. फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर पोलीस पथक पुण्यात गेले होते. तेथे 14 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. या तपासात क्रिकेट सट्टेबाजीचे मोठे रॅकेट समोर आले. एकांश नावाच्या बुकीने 40 पेक्षा जास्त बँक खात्यांद्वारे सुमारे 250 कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे उघड झाले.
‘मोठ्या वसुली’च्या चर्चांनंतर तपासाला वेग
तपासादरम्यान मोठ्या आर्थिक व्यवहाराची आणि कथित वसुलीची चर्चा सुरू झाली होती. त्याचवेळी दोन पोलिसांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकारही समोर आला होता. या घटनेनंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आणि संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला. यानंतर गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली. सुरुवातीला पुन्हा “आरोपी मिळाला नाही” अशीच भूमिका घेण्यात आली. मात्र, पुढील चौकशी डीसीपी नित्यानंद झा यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी पथकातील सर्व सदस्यांची सखोल चौकशी केली असता पुण्यात संशयिताची प्रत्यक्ष भेट झाल्याचे स्पष्ट झाले.
9 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
या प्रकरणात पोलीस निरीक्षक योगेश घारे, बळीराम सुतार, एपीआय विजय राणे यांच्यासह प्रफुल्ल ठाकरे, सतीश वाघ, श्रीकांत गोणेकर, सुशील चांगोले, अजय पवार आणि सौरभ हिवरकर या नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
आयपीएस दीपक अग्रवाल यांच्याकडे सायबर विभागाची धुरा
सायबर पोलिस ठाण्यातील कारवाईनंतर आयपीएस दीपक अग्रवाल यांच्याकडे नागपूर सायबर विभागाची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सध्या डीसीपी मुख्यालय म्हणून कार्यरत असून आर्थिक गुन्हे शाखेचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. यापूर्वी सायबर विभागाचा अतिरिक्त पदभार हृषीकेश सिंगारेड्डी आणि लोहित मतानी या दोन अधिकाऱ्यांकडे होता. मात्र, आता दोन्ही झोनची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे देण्यात आली आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. सायबर गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणे आणि ऑनलाइन फसवणुकीच्या बळी ठरलेल्या नागरिकांना तातडीने दिलासा देणे, हेच पुढील काळातील प्राधान्य असेल, असे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

