(रत्नागिरी / वार्ताहर)
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेहमेळावा शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी प्रशालेत मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. सायंकाळी ४ वाजता आयोजित या मेळाव्यास सुमारे १०० माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर संस्था व शाळेसाठी योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष साजिदभाई शेकासन यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थी संघाचे महत्त्व विशद करत शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. ओळख परेड दरम्यान कॅप्टन नईम भोंबल यांनी, “आम्ही याच शाळेतून घडून आज विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे. त्यामुळे शाळेच्या भावी उपक्रमांमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावे,” अशी भावना व्यक्त केली.
माजी विद्यार्थी सुनील उर्फ भाई जाधव यांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीसाठी दरवर्षी निधी संकलन करून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच साजिदभाई शेकासन यांच्या नेतृत्वामुळे गावासोबतच शाळेलाही फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी सज्जादभाई सय्यद यांनी शाळेच्या प्रगतीबाबत बोलताना राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या शिफारसीमुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून शाळेला भव्य व्यायामशाळा व व्यायाम साहित्य उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच उद्योजक अण्णा सामंत यांचेही विशेष आभार व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष उदय महाकाळ यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्याची संधी मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला. कोषाध्यक्ष दीपक भार्गव लिंगायत यांनी शाळेसाठी कायम योगदान देण्याची तयारी दर्शवली.
मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि शाळेचे माजी विद्यार्थी सलीम मुकादम यांनी मिमिक्री सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले.
यावेळी हनिफ पेटकर, जावेद ठाकूर, रईस मुल्ला, डॉ. मयुरेश मोहिते, मुज्जमिल मुल्ला, रिजवान शेकासन, वसिम खान, ओमकार शिर्के, फहिम भोंबल, श्रीधर पवार, रुपेश पवार, उदय वझे, संदीप मेस्त्री, अनिकेत पवार तसेच माजी विद्यार्थीनी मुसरत काझी-कापडे, नसिरा काझी-माद्रे, रुखसार खान, तस्बीहा पेटकर, भाग्यश्री पवार, स्मिता मोहिते, सोनल मोहिते, सायली मोहिते, श्रुणाली मोहिते, नाजनिन सय्यद-खलपे, तसनीम सय्यद-मुकादम, सलोनी पवार, तनुजा सागवेकर, चंदना साईलकर आणि छाया सावंत यांनी शुभेच्छा देत कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे उपाध्यक्ष अ. अजिज इस्माईल मुकादम, सचिव समीर अ. रज्जाक सय्यद, खजिनदार वहाबभाई खलपे, सदस्य लियाकत शेकासन, जावेद काझी, मुजफ्फर सय्यद तसेच शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. यामध्ये शेकासन मॅडम, गंधेरे सर, चव्हाण सर, संज्योत खेडेकर मॅडम, लिपिक शोझब चिकटे यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र लवंदे, फैयाज भाटकर, सुवर्णा बैकर, सौ. सय्यद यांच्यासह सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एम. जी. कुलकर्णी, विष्णू कुंभार सर, माजी क्रीडा शिक्षक संभाजी जाधव सर, नांदुरकर सर, डोके सर तसेच संस्था सदस्य इम्रान चिकटे, समिउद्दीन माद्रे, अ. गणी दळवी आणि रफिक मुल्ला यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
समूह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी अध्यक्ष साजिदभाई शेकासन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

