(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांपैकी एक असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा सध्या एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आले आहेत. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक म्हणून ओळखले जाणारे पराग शहा यांनी चक्क घाटकोपरच्या रस्त्यावर भिकाऱ्याचे रूप धारण करून भीक मागितली. त्यांचा भिकाऱ्याच्या वेशातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा प्रकार पाहून अनेकांना प्रथमदर्शनी ते भिकारीच असल्याचे वाटले. मात्र, हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा असल्याचे समोर आले आहे.
पराग शहा यांनी हा प्रयोग जैन धर्मगुरू नम्रमुनी महाराज यांच्या सल्ल्यानुसार केला. जैन चातुर्मासादरम्यान नम्रमुनी महाराज यांनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याचे जीवन जगून त्याचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला होता. गुरूंच्या या सल्ल्याचे पालन करत पराग शहा यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, आलिशान गाडी आणि महागड्या वस्तू मागे ठेवत स्वतःचा वेष बदलला आणि एक दिवस भिकाऱ्याच्या भूमिकेत घालवला.
या प्रयोगासाठी त्यांनी साधे कपडे परिधान केले तसेच चेहरा आणि संपूर्ण देखावा बदलण्यात आला. त्यानंतर ते घाटकोपरमधील गर्दीच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेशात फिरले. सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया जवळून अनुभवण्यासाठी त्यांनी लोकांकडे मदत मागितली. काहींनी त्यांना मदत केली, तर काही जण दुर्लक्ष करून पुढे गेले. दया, उपेक्षा, मदत आणि नकार अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना या काळात अनुभवायला मिळाल्या.
घाटकोपरसारख्या गजबजलेल्या परिसरात भिकाऱ्याच्या वेशात संपूर्ण दिवस घालवण्याचा हा अनुभव पराग शहा यांच्यासाठी वेगळा ठरला. या काळात त्यांनी सामान्य नागरिकांच्या नजरेतून आपल्या मतदारसंघाचा अनुभव घेतला. रस्त्यावर जीवन जगणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया मिळतात, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला.
हा प्रयोग केवळ राजकीय स्टंट नसून गुरूंच्या शिकवणुकीनुसार आत्मानुभव घेण्याचा प्रयत्न असल्याचे पराग शहा यांनी सांगितले. आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी हा अनुभव घेतला आणि त्यासाठी आपली नेहमीची ओळख पूर्णपणे बाजूला ठेवली.
या अनुभवादरम्यान मुंबईकरांच्या मदतीची भावनाही त्यांना अनुभवता आली. एका व्यक्तीने त्यांना २० रुपये देऊन जेवण करण्यास सांगितले. तसेच एका समोसा विक्रेत्याने पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने कोणतेही पैसे न घेता त्यांना समोसा दिला. आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही त्या विक्रेत्याने केलेली मदत आपल्याला मुंबईतील माणुसकीची जाणीव करून देणारी ठरल्याचे पराग शहा यांनी सांगितले.
पराग शहा हे व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय असून २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी ३,३८३ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जाहीर केली होती. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक संपत्ती जाहीर करणाऱ्या उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश झाला होता. त्यापूर्वी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम केले आहे.
भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर बसल्यानंतर पराग शहा यांनी नंतर आपल्या नेहमीच्या रूपात त्याच परिसरातील काही ठिकाणी भेट दिली आणि नागरिकांशी संवाद साधला. या संपूर्ण प्रयोगातून एखाद्या व्यक्तीची बाह्य ओळख बदलल्यानंतर समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, याचा अनुभव त्यांना मिळाला.
पराग शहा हे भारतातील पहिल्या क्रमाकांचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. पराग शहा यांच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील. 2024 विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी सध्याची संपत्ती 3353.06 कोटी इतकी असल्याचे नमूद केले. पाच वर्षात पराग शहा यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्र सादर करताना त्यांची संपत्ती 550 कोटी असल्याचे नमूद केले होते.
पराग शाह हे रिअल इस्टेट (बिल्डर) व्यवसायिक आहेत. रिअल इस्टेट व्यवसायात त्यांचा चांगला जम आहे. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही बांधकाम कंपनी चालवतात. पराग शाह हे शाह हे एमआयसीआय ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत. 2एकनाथ शिंदे यांची संपत्तीसह पराग शाह यांच्या संपत्तीची तुलना केली असता आकडा चकित करणारा आहे. एकनाथ शिंदे यांची संपत्ती 37.68 कोटी रुपये आहे. पराग शहा यांची संपत्ती 37.68 कोटींच्या 90 पट म्हणजेच 3353.06 कोटी इतकी आहे.
कोट्यवधींची संपत्ती आणि राजकीय पद असलेले आमदार पराग शहा यांनी गुरूंच्या सल्ल्यानुसार एका दिवसासाठी भिकाऱ्याचे जीवन जगल्याने त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे. घाटकोपरच्या रस्त्यावर भिकाऱ्याच्या वेशात घालवलेला हा एक दिवस त्यांच्या आयुष्यातील वेगळा अनुभव ठरला आहे.


