(बीड )
बीड जिल्ह्यात ‘लुटेरी नवरी’च्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका 19 वर्षीय तरुणीने तब्बल आठ जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. नवव्या लग्नाच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. हा प्रकार बीड जिल्ह्यातील उमापूर गावात समोर आला. विवाह एजंटमार्फत एका युवकाचे लग्न ठरवण्यात आले होते. मात्र, संशय आल्याने पीडित युवक योगेश शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि तपासात मोठा खुलासा झाला.
8 लग्न, 9व्या वेळी बिंग फुटले
तपासात समोर आले की संबंधित तरुणीने यापूर्वी आठ जणांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे आणि दागिने उकळले होते. नवव्या लग्नासाठीही एजंटमार्फत मोठी रक्कम घेतली गेली. लग्नानंतर काही दिवसांतच ती पतीच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार होत असे. पीडित युवकाकडून सुमारे 3.5 लाख रुपये लग्नासाठी घेतले गेले होते. त्यानंतर लग्नानंतरही विविध कारणे सांगत पैसे उकळले गेले. अखेरीस सुमारे 9 लाखांचा ऐवज घेऊन आरोपी फरार झाली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुणीनेच आपल्या आधीच्या आठ लग्नांची कबुली दिली आणि त्याचे पुरावेही दाखवले. यानंतर पीडित युवकाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या टोळीमध्ये काही एजंटचा समावेश आहे. ते ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना शोधून त्यांना जाळ्यात ओढतात. तसचं काहीसं उमापूरातील या पीडित नवरदेवा सोबत झालं. त्याला आधी साडे तिन लाख रुपये मागण्यात आले. त्यानंतर मुलगी दाखवण्यात आली. त्याला ती पसंत पडली. तो लग्नाला तयारही झाला. रितसर लग्न लावण्यात आलं. नंतर मात्र नवरी आपले रंग दाखवू लागली. आईकडे जायचं आहे असं सांगत होती. त्यासाठी खोटी आई तयार करण्यात आली. पण त्यानंतर ही तिची डाळ काही शिजली नाही. मग तिनेच स्वत:हून नवऱ्याला आपली आधी 8 लग्न झाली आहेत असं सांगितलं. ऐवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने त्याचे पुरावे ही त्याला दिले.
हे पाहुन नवऱ्याच्या पाया खालची वाळू सरकली. या नवरीने लाखो रूपयांची कॅश आणि दागिने घेवून नंतर पोबारा केला. जवळपास नऊ लाखांचा ऐवज तिने लंपास केला. लग्नाच्या नावाखाली या टोळीने पीडित तरुणाकडून लाखो रुपये उकळले आहेत. फसवणूक झालेला नवरदेव योगेश शिंदे याने अखेर या प्रकरणी न्यायासाठी पोलीस प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणी आणि एजंटाला अटक केली आहे. टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.
ग्रामीण भागातील विवाहासाठी इच्छुक तरुणांना लक्ष्य करून अशा टोळ्या सक्रिय झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. लग्न जमवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळून नंतर नवरी फरार होण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विवाह ठरवताना पूर्ण पडताळणी करण्याचा सल्ला दिला आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

