(रत्नागिरी )
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील गाजलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना नेते तथा माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुडचे सरपंच यांच्यावर भारतीय दंड विधानातील विविध कलमांखाली तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सरकार पक्षाचे आरोप काय होते?
सरकार पक्षाने साई रिसॉर्टच्या बांधकामात अनेक गैरप्रकार झाल्याचा दावा केला होता.
- इमारत पूर्ण नसताना कर आकारणी
- स्टॅम्प शुल्क टाळणे
- सीआरझेड क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम
- बनावट सह्या आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज मीटर मिळवणे
मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचा युक्तिवाद मांडला.
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत पुरावे अपुरे असल्याचे नमूद केले आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून गाजत असलेल्या या प्रकरणावर कायदेशीर पडदा पडला आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार आरोप केले होते. मुरुड समुद्रकिनाऱ्यालगत 200 मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, रिसॉर्ट बांधकामासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचा आणि मनी लाँड्रिंग झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी 14 नोव्हेंबर 2022 रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. आता न्यायालयाच्या निकालानंतर सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने या प्रकरणाचा शेवट झाला आहे.

