(पुणे)
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मुंबईतील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय ४४, रा. मुलुंड पश्चिम, ग्रेटर मुंबई) असे आहे. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सखोल आणि तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
इस्लामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेची रक्तबंबाळ अवस्था असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहाय्यक पोलीस फौजदार संदीप यादव यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मोटारीच्या मागील सीटवर डॉ. वानखेडे बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांना तात्काळ इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कौटुंबिक वाद आत्महत्येचे कारण?
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. शुभांगी वानखेडे या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या. काही दिवसांपासून घरात किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी “रुग्णालयात चालले आहे” असे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र त्या थेट वाघवाडी फाट्याजवळ गेल्या, जिथे त्यांनी स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या केली. गंभीर रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला त्वरीत आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आत्महत्येमागील नेमकी पार्श्वभूमी शोधून काढावी आणि सत्य जनतेसमोर यावे, यासाठी विशेष तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सध्या इस्लामपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत