(रत्नागिरी)
शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून दिवसाढवळ्या कार चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने मारुती सुझुकी कंपनीची ‘विटारा ब्रीझा’ ही चारचाकी काही क्षणांत पळवून नेली. या घटनेमुळे शहरातील वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश श्रीपाद काटदरे (वय 56, रा. शिवाजीनगर) हे गाडी खरेदी-विक्री व्यवसायिक आहेत. रविवारी (3 मे) दुपारी सुमारे 4:40 वाजता त्यांनी ही पांढऱ्या रंगाची विटारा ब्रीझा (क्र. MH 02 EK 2302) साळवी स्टॉप येथील जोशी मेडिकलसमोर उभी केली होती. काही वेळातच अज्ञात व्यक्तीने संधी साधत ही कार लंपास केली.
चोरीला गेलेल्या वाहनाची अंदाजे किंमत सुमारे 4 लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, साळवी स्टॉपसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आणि तेही भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
याप्रकरणी महेश काटदरे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.
पोलीस नागरिकांना वाहन पार्क करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत.

