(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच प्रभावी संवादकौशल्य, सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि न्यायालयीन मांडणीची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ‘कथाकथन’ आणि ‘कथालेखन’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध लेखिका आणि कथाकथनकार सुनीता तांबे यांनी विद्यार्थ्यांना कथाकथनाची शास्त्रशुद्ध पद्धत, कथेची रचना, आशयाची मांडणी तसेच प्रभावी कथाकथनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे मार्गदर्शन केले. केवळ व्याख्यानापुरते मर्यादित न राहता त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथाकथन करून घेतले. त्यांच्या सादरीकरणातील गुण-दोष स्पष्ट करून त्यात आवश्यक सुधारणा कशा करता येतील, याबाबतही मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी झालेल्या कथालेखन कार्यशाळेत तांबे यांनी कथालेखनाची संकल्पना, कथेचे विविध प्रकार, प्रभावी कथा लिहिण्याची तंत्रे तसेच कथालेखनासाठी आवश्यक असलेल्या घटकांचे सविस्तर विवेचन केले. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथालेखनाचा सराव करून घेत त्यांनी लेखनासाठी उपयुक्त सूत्रेही सांगितली. या उपक्रमात विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि कथालेखनासारखी कौशल्ये अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. न्यायालयीन युक्तिवाद करताना तथ्यांची प्रभावी मांडणी, प्रकरणाचे विश्लेषण, मुद्देसूद संवाद आणि प्रभावी अभिव्यक्ती यांना विशेष महत्त्व असते. या सर्व बाबी विकसित करण्यासाठी कथाकथन आणि कथालेखनाच्या सरावाचा मोठा फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखन, प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. सहभागी विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचे स्वागत करत भविष्यातही अशा कौशल्यविकासाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापिका डॉ. संयोगिता सासने यांनी केले. स्वागत व सत्कार प्राध्यापिका तृप्ती देवरुखकर यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका गौरी शेवडे यांनी केले, तर आभार प्राध्यापिका धनश्री कदम यांनी मानले.

