(मुंबई)
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढू लागला असून सर्वच राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला धक्का दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी भाजपने तयार केलेले विशेष प्रचार गीत आयोगाने आचारसंहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत नाकारले आहे.
भाजपकडून निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या या गीतामध्ये ‘भगवा’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. हा शब्द आचारसंहितेच्या चौकटीत बसत नसल्याचे नमूद करत निवडणूक आयोगाने या गीताला परवानगी देण्यास नकार दिला. हे प्रचार गीत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सामंत यांनी गायले होते. आयोगाच्या निर्णयामुळे भाजपच्या प्रचार योजनेला मोठा फटका बसला असून आता पक्षाला प्रचारासाठी नवी रणनीती आखावी लागणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणेही लक्षवेधी ठरत आहेत. एकूण २२७ जागांपैकी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने तब्बल २९ जागांवर उमेदवार न दिल्याने या वॉर्डांमध्ये थेट लढती रंगत आहेत. या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे विरुद्ध भाजप व शिवसेना शिंदे गट महायुती असा थेट सामना होत आहे.
काँग्रेस आणि वंचित आघाडीने उमेदवार न उतरवल्यामुळे मतविभाजनाची शक्यता कमी झाली असून या दुरंगी लढतींचा फायदा ठाकरे बंधूंना होणार की महायुतीला, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

