(पुणे)
शहरातील पियानो प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी ॲकॅडमीमध्ये शाळकरी मुलासोबत सफाई कर्मचार्याने अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध POCSO Act अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
कसा उघड झाला प्रकार?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगा विमानतळ परिसरातील पियानो ॲकॅडमीमध्ये नियमित प्रशिक्षणासाठी जात असे. ८ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ॲकॅडमीतील सफाई कर्मचार्याने मुलासोबत अश्लील कृत्य केले. त्याची लैंगिक सतावणूक करुन गैरवर्तन केले. घाबरलेल्या मुलाने त्वरित घरी परतत आईला संपूर्ण घटना सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुलाच्या आईने तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तपास सुरू, आरोपीचा शोध
या गंभीर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पोलिसांनी ॲकॅडमीतील अन्य कर्मचाऱ्यांची चौकशीही सुरू केली आहे.

