(रत्नागिरी / प्रतिनिधी)
समाजामध्ये अनेक धक्कादायक व मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असून यामुळे समाजमन हेलावत आहे. अशीच एक घटना सिंधुदुर्गातील देवगडच्या खोल समुद्रात एका नौकेवरील खलाशाने तांडेलचां शिरच्छेद केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आज सोमवारी (दिनांक 28 ऑक्टोबर 2024) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नौकेवरील आपसातील वाद विकोपाला गेल्याने छत्तीसगड येथील जयप्रकाश विश्वकर्मा या निर्दयी खलाशाने रत्नागिरी गुहागर येथील तांडेलचे शिरच्छेद करून त्यानंतर त्याने रागाच्या भरात नौकेलाच आग लावत पेटवून दिले. भर समुद्रात बोटीचा थरार अंगावर काटा आणणारा होता. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तांडेल रवींद्र नाटेकर ( राहणार गुहागर, रत्नागिरी ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खून करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरीतील राजीवडा येथील रुमान रफिक फणसोपकर यांच्या मालकीची मुजत राबिया नौका ही दुपारी साडेबाराच्या सुमारास देवगडच्या दिशेने समुद्रात मासेमारी करण्याकरिता गेली होती. देवगडजवळील कुणकेश्वरपासून पंधरा वाव अंतरात नौकेवर काम करणाऱ्या झारखंडमधील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा याची तांडेल रवींद्र नाटेकर याच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. संतापलेल्या जयप्रकाश खलाशाने रागाच्या भरात थेट रवींद्र याचे सूऱ्याने शिरच्छेद करून हत्या केली. इतक्यावरच न थांबता संतापलेल्या जयप्रकाश खलाशाने शिर उचलून नौकेच्या पुढे आणून ठेवले. या क्रूर कृत्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही त्यामुळे जयप्रकाशने स्वतःच नौकेला आग लावून पेटवून दिले. नौका पेट घेत असल्याने इतर खलाशी प्रचंड भयभीत झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावा की आपले जीव वाचावावा अशा दुहेरी संकटात खलाशी सापडले. काही वेळाने नौकेने रौद्ररूप धारण केल्याने अखेर खलाशांनी आपले प्राण वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. आगीने पेटलेल्या नौकेवरील खलाशांना वाचवण्याचा इतर दाखल झालेल्या नौकेतील खलाशांनी प्रयत्न केला.
या घटनेची माहिती तत्काळ मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली. त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस दलास माहिती दिली. सागर पोलीस दलाच्या गस्ती नौकेने तातडीने घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले. यावेळी देवगड बंदरातून म्हाळसा मल्हार या नौकेने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक मच्छीमार, सागर सुरक्षा दलाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केला. तसेच नौकेतील सर्व खलाशांना देवगड बंदरात मिनाक्षी नौकेवरून आणण्यात आले.
हत्या करून पलायन करणाऱ्या जयप्रकाशला पोलिसांनी पकडले
या घडलेल्या संतापजनक प्रकाराने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली. भर समुद्रात आगीच्या ज्वाळा भडकत असल्याचे समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना दिसून आले. तसेच समुद्रात मासेमारी करत असलेल्या इतर नौकानी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत नौका जळत असताना इतर बोटीवरील खलाशी ओरडुन खून करणाऱ्या जयप्रकाश खालाशालाही समुद्रात उडी मारण्याचा सल्ला देत होते. मात्र तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही वेळाने अखेर जयप्रकाश या खलाशाने देखील समुद्रात उडी मारली. तो समुद्रातून पलायन करत होता. मात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी जयप्रकाशला ताब्यात घेतले. या सर्व थरारक घटनेत रवींद्र नाटेकर याचा खून झाल्याची माहिती रत्नागिरीत कळताच अनेक खलाशी देवगडच्या दिशेने रवाना झाले होते. तर गुहागरातुन त्याचे नातेवाईक देखील देवगडच्या दिशेने निघाले होते.
काही क्षणात आगीने घेतले रौद्ररूप
खोल समुद्रातील थरारक घटनेचा व्हिडीओ सद्या व्हायरल होत आहे. पेटलेल्या नौकेच्या आजूबाजूला अनेक मच्छीमारी नौका दाखल झाल्या होत्या. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात धुराचे लोट पसरले होते. या आगीचे हवेत पसरणारे लोट पाहून आग आटोक्यात आणण्यासाठी कोणाचेही धाडस झाले नाही. त्यामुळे भर समुद्रात आगीत पेटत असलेली नौका दिसून येत आहे.
(बातमी अपडेट होत राहील)