(मुंबई / प्रतिनिधी)
मुंबईच्या लोअर परळ भागातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नाथस्वामी बेकरी मठातर्फे ५०० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना परमपूज्य सद्गुरू श्री.नाथस्वामी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात हजारो शुभ चिन्हांकित वह्यांचे वाटप करण्यात आले.
नाथस्वामी बेकरी मठातर्फे सातत्याने बहुविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच्याच एक भाग म्हणून परब्रह्म भगवान स्वामी समर्थ महाराज, बुद्धी दैवत गणपती आणि सरस्वती माता यांचा आशीर्वाद लाभून विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी व्हावेत आणि त्यांना थोडी मदत मिळावी या उद्देशाने गरजू विद्यार्थ्यांना नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. बेकरी मठाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालक, नागरिक आणि भक्त,भाविकांची मोठी गर्दी होती.अखिल नाथस्वामी भक्त परिवाराने या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.
ज्ञान, विज्ञान,विवेक अंगीकारा – गुरुवर्य नाथस्वामी
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गुरुवर्य श्री.नाथस्वामी म्हणाले की, ज्ञान,विज्ञान आणि विवेक हे अखिल नाथस्वामी भक्त परिवार या विश्वव्यापी कुटुंबाचे ब्रीद आहे.याचे विश्लेषण करतांना गुरुवर्य नाथस्वामी सांगतात की, योग्य गुरूंकडून यथावकाश ज्ञान प्राप्त करून झाल्यावर विज्ञानाची कास न सोडता म्हणजे, योग्य शैक्षणिक पदवी संपादन करत स्वतःचा विवेक परिपक्व करत त्याला सद्सदविवेकामध्ये परिवर्तीत करणे हेच आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे.असे नमूद करून पुढे ते म्हणाले की, आईवडील हे आपले प्रथम गुरु असून त्यांची सेवा करतानाच शिक्षण पूर्ण करून समाज आणि राष्ट्रासाठी युवा पिढीने योगदान दिले पाहिजे. सदाचारी आणि निर्व्यसनी राहून आदर्श नागरिक बना. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिक आणि श्रावणबाळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. शालेय शिक्षण पूर्ण करताना मोबाईलचा वापर करू नका. अपयश आले तरी खचून जाऊ नका. नेहमी सकारात्मक विचार बाळगा आणि चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवा. त्या ध्येयाचा पाठलाग करा. परिश्रम करायला कमी पडू नका. अभ्यासात लक्ष द्या. भरपूर खेळा, जीवनाचा आनंद घ्या मात्र चुकीची संगत आणि व्यसन यांच्या आहारी जाऊ नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
गुरुवर्य श्री नाथस्वामी यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थी, पालक आणि भाविक मंत्रमुग्ध झाले. लोअर परळ डिलाईल रोड येथे नाथस्वामी बेकरी मठ असून दररोज आरती, प्रश्नोत्तरे आणि सत्संग असे कार्यक्रम होत असतात. श्री स्वामी महाराजांच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी या मठात दररोज भाविकांची गर्दी असते. दर गुरुवारी महाप्रसादाचे भाविकांना वाटप केले जाते.