(खेड/ रत्नागिरी)
खेड तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने आपल्या सख्ख्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात संतोष भागोजी माने (वय ५०) हे गंभीर जखमी झाले असून, खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपी तुकाराम भागोजी माने हा मद्यप्राशन करून घरी परतला होता. त्यावेळी तो आपल्या तिसऱ्या भावाचा मुलगा मंगेश याला विनाकारण मारहाण करत होता. ही मारहाण थांबवण्यासाठी आणि कारण विचारण्यासाठी संतोष माने पुढे सरसावले असता, आरोपीचा संताप अनावर झाला. याच संतापातून तुकाराम माने याने हातातील कोयत्याने संतोष माने यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर वार केला. या प्रहारात ते गंभीर जखमी झाले. इतकेच नव्हे, तर आरोपीने शिवीगाळ करत त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी संतोष माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी २ मे रोजी मध्यरात्री १२.२४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ११५, ३५२, ३५१ (२) (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, कौटुंबिक वादातून सख्ख्या भावांमध्ये झालेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

