(खेड / रत्नागिरी)
खेड तालुक्यातील सात्विनगाव-बोलेवाडी येथे ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील माळ्याच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. सोनू शंकर बोले (वय ५१, रा. सात्विनगाव, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोनू बोले यांनी राहत्या घरात कोणत्या तरी अज्ञात कारणातून माळ्याच्या हुकाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, खेड पोलिसांकडून त्याबाबत माहिती घेण्यात येत आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


