(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील साठरेबांबर ठोंबरेवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ६८ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात मेघना शरद मोघे यांच्यासह आठ ते नऊ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयंत भार्गव पिंपटकर हे रविवारी सकाळी सुमारे १०.२० वाजता आपल्या घरी असताना मेघना मोघे या सात-आठ मुली व एका पुरुषासह त्यांच्या घराशेजारील कंपाऊंडमध्ये दाखल झाल्या. त्यांनी पिंपटकर यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून जुन्या जमिनीच्या वादावरून वाद उकरून काढत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी “जीवे ठार मारू” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली. जयंत पिंपटकर हे भारतीय टपाल विभागातून मेल ओव्हरसियर पदावरून सेवानिवृत्त झाले असून सध्या शेती व्यवसाय करतात. घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी तत्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी रात्री ११.१९ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०/२०२६ नुसार आरोपींविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, अतिक्रमण करणे आणि धमकी देणे यांसह भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३२९(१), ३२९(२), ३२९(३), १८९(२), १९१(२), १९०, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

