(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ८५ वर्षीय महिलेसह चालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचा ताबा सुटल्याने घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-०७ एबी-५३५४ क्रमांकाची स्विफ्ट कार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. सायंकाळी सुमारास ही कार खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील जाधववाडी येथे आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर टायरचे व्रण दिसत होते, तर महामार्गालगत असलेल्या गावाच्या फलकाला धडक देत कार थेट खड्ड्यात जाऊन आदळली.
या कारमध्ये प्रवास करणाऱ्या जुबेदा शहा (वय ८५, रा. कल्याण) आणि अरबाज (वय २७, चालक) या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. दोघेही कणकवलीच्या दिशेने प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून भरणे नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासानुसार, चालकाला प्रवासादरम्यान डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, खेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

