(खेड /रत्नागिरी प्रतिनिधी)
दहिवली येथील भीषण भूस्खलनाच्या जखमा अद्याप ताज्याच असताना खेड तालुक्यावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचे सावट दाटले आहे. तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील गोटलवाडी येथे डोंगराला पडलेल्या प्रचंड भेगांमुळे संभाव्य भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने १९ कुटुंबांतील ७४ नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोटलवाडी वस्तीलगत असलेल्या डोंगररांगेत तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीत मोठ्या प्रमाणावर भेगा आणि तडे पडल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भेगा अधिक रुंदावत असून, डोंगराचा काही भाग कोणत्याही क्षणी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
काही दिवसांपूर्वीच दहिवली येथे भूस्खलन होऊन एका घरावर दरड कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर संपूर्ण तालुका हादरला असतानाच गोटलवाडीतील परिस्थितीने नागरिकांची चिंता आणखी वाढवली आहे. दहिवलीसारखी घटना येथे घडू नये, यासाठी प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महसूल विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रभावित परिसरातील १९ कुटुंबांतील एकूण ७४ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. या सर्वांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळा, गोटलवाडी (चिंचवली) येथे करण्यात आली असून, प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.
दरम्यान, ज्या ठिकाणी जमिनीला मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या आहेत, त्या परिसरावर प्रशासन आणि ग्रामस्थांकडून चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूगर्भतज्ज्ञांकडून या परिसराची तांत्रिक पाहणी करून भूस्खलनाचा धोका किती गंभीर आहे, याचा अभ्यास करण्याचीही आवश्यकता व्यक्त होत आहे.
कोकणातील अतिवृष्टीमुळे दरवर्षी भूस्खलनाच्या घटना समोर येत असल्या, तरी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अशा संवेदनशील भागांचे वैज्ञानिक सर्वेक्षण, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर स्थलांतर हीच जीवितहानी टाळण्याची प्रभावी उपाययोजना असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. सध्या गोटलवाडीतील नागरिक सुरक्षित असले, तरी डोंगराला पडलेल्या भेगांनी संपूर्ण परिसरावर भीतीचे गडद सावट पसरले असून, प्रशासनाच्या पुढील प्रत्येक हालचालीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

