(सिंधुदूर्ग / वृत्तसंस्था)
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत विनापरवाना घुसून ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील मलप्पे बंदराच्या नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाने अखेर पकडण्यात यश मिळवले आहे. ‘सुलतान (Sulthan)’ नावाची ट्रॉलर नौका देवगडसमोरील समुद्रात पाठलाग करून ताब्यात घेण्यात आली. नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. जप्त केलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियमित सागरी गस्तीवेळी ही कारवाई करण्यात आली. मुणगे समोरील समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर संबंधित नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करत असल्याचे आढळले. गस्ती नौका दिसताच ‘सुलतान’ने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विभागाच्या पथकाने पाठलाग सुरू ठेवत देवगडसमोरील समुद्रात तिला रोखले आणि ताब्यात घेतले. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘सुलतान (Sulthan)’ असून, तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6335 असा आहे. श्रीमती गुलफाम अब्दुल मुनाफ या नौकेच्या मालक असून, त्या पुत्तूर, जि. उडुपी, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. संबंधित नौकेचा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.
मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी मलप्पे बंदरातील नौकांकडून वारंवार मासेमारीची जाळी तोडली जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात घुसून मासेमारी करणाऱ्या मलप्पे बंदरातील नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले होते. गेल्या पाच दिवसांत अशा नौका पकडण्यासाठी दोन वेळा प्रयत्न करण्यात आले; मात्र गस्ती नौकेपेक्षा अधिक क्षमतेच्या इंजिनमुळे संबंधित नौका दोन्ही वेळा निसटण्यात यशस्वी झाल्या होत्या. तरीही विभागाच्या पथकाने पाठलाग थांबवला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात बेकायदा मासेमारी करणारी नौका पकडण्यात यश आले.
या कारवाईकडे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सातत्याने लक्ष असल्याचे सांगण्यात आले. परप्रांतीय नौकांकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणाऱ्या घुसखोरीविरोधात त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळाले असून, बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरुद्ध प्रभावी कार्यवाही होत असल्याने स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मालवणचे अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला आणि देवगडचे अंमलबजावणी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ या गस्ती नौकेच्या मदतीने ही कारवाई केली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक दीपेश मायबा, दिवाकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी मोहिमेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.
रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे पथकासमोर मोठे आव्हान होते. यापूर्वी दोन प्रयत्न अपयशी ठरूनही अधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यांच्या चिकाटी आणि कर्तव्यनिष्ठेमुळे तिसऱ्या प्रयत्नात कारवाई यशस्वी झाली. परप्रांतीय नौकेविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले असून, बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी विभागाकडून सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोहिमा राबविल्या जात आहेत.
अशा कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित जपण्याबरोबरच सागरी जैवविविधतेच्या संरक्षणालाही मदत होत आहे. नवीन गस्ती नौका उपलब्ध झाल्यानंतर बेकायदा मासेमारीविरोधातील मोहिमांना आणखी वेग येईल आणि स्थानिक मच्छिमारांना निर्धास्तपणे मासेमारी करता येईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणाऱ्या बेकायदा मासेमारीविरोधात यापुढेही ‘शून्य-सहनशीलता’ धोरण कायम ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.


