(रत्नागिरी / वैभव पवार)
नवोदित कवींना कवितालेखनाची दिशा मिळावी, साहित्यनिर्मितीचे विविध पैलू समजावेत आणि समाजातील विविध घटकांसाठी साहित्याची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने सत्कोंडी येथे आयोजित करण्यात आलेली नवकवींसाठीची कवितालेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त स्व. अनंतरावजी बैकर बहुद्देशीय संकुल, सत्कोंडी येथे या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडी येथे आयोजित करण्यात येईल, असे जाहीर केले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. प्रदीप ढवळ यांनी सत्कोंडीकरांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. येथील परिसर, इमारतींची व्यवस्था आणि कार्यपद्धती अत्यंत सुंदर व नीटनेटकी असून, नोंद घ्यावी असे नियोजन करण्यात आल्याने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पुढील वर्षीचे जिल्हा साहित्य संमेलन सत्कोंडी येथे होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीचे विद्यमान सरपंच सतीश थुळ होते. ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडीचे अध्यक्ष संजय बैकर यांनी बीजभाषण केले. समाजातील वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या घटकांसाठी साहित्याची दारे खुली करण्याच्या दृष्टीने अशा कार्यशाळांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत रत्नागिरीतील मान्यवर साहित्यिकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रत्नागिरीतील आद्य गजलकार देविदास पाटील यांनी ‘कविता लिहिताना : माझा लेखन प्रवास’ या विषयातून आपल्या लेखनप्रवासातील अनुभव मांडले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभागप्रमुख अरुण मोर्ये यांनी ‘अनुभवातून कविता : शब्द, प्रतिमा आणि संवेदना’ या विषयावर मार्गदर्शन केले. नवोदित गझलकार राजू सुर्वे यांनी ‘गझल : तंत्र, लय आणि आशय’ या विषयातून गझललेखनाचे तांत्रिक पैलू स्पष्ट केले. जिल्हा मराठी भाषा समिती, रत्नागिरीचे सदस्य प्रा. शिवराज गोपाळे यांनी ‘कविता घडते कशी? निर्मिती, वाचन आणि समीक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करत कवितेच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली.
कवी केशवसुत स्मारक समिती, मालगुंडचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि गणपतीपुळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सविता तोटावार यांनीही उपस्थित शिक्षक व प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी जांभारी केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. परब, कोमसापच्या रत्नागिरी जिल्हा सचिव मुश्ताक खान, कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनीताई खेर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात पुस्तकांना खांद्यावर घेऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनाच्या ठिकाणी राजू सुर्वे यांनी रेखाटलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमात सत्कोंडी गावचे सुपुत्र आणि युवा साहित्यिक अरुण मोर्ये यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा नाट्य विभागातील प्रथम क्रमांकाचा भाई भगत नाट्य पुरस्कार मिळाल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील जवळपास ४४ प्रशिक्षणार्थींनी या एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग घेतला. मान्यवर कवी आणि समीक्षकांच्या मार्गदर्शनातून कवितेचे विविध पैलू उलगडण्यात आले. मार्गदर्शन सत्रांनंतर प्रशिक्षणार्थींसाठी एक तासाचा प्रत्यक्ष सरावही घेण्यात आला. या उपक्रमाबद्दल सहभागी मार्गदर्शक, प्रशिक्षणार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण मोर्ये यांनी केले.


