(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिऱ्या–नागपूर महामार्गाचे मुख्य काम वेगाने सुरू असल्याचे चित्र रंगवले जात असताना, प्रत्यक्षात सर्विस रोडसारख्या मूलभूत सुविधांकडे महामार्ग प्राधिकरणाचे उघड दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. सर्विस रोडच्या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. जेके फाईल परिसर, नाचणे येथील टीआरपी तसेच गणेश कॉलनी ते जेके फाईल दरम्यानचा सर्विस रोड अद्याप अपूर्ण असल्याने दैनंदिन प्रवासात अडथळे, धुळीचा त्रास आणि अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदार कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रश्नावर यापूर्वीही स्थानिकांनी वारंवार आवाज उठवत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. मात्र, आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कृती न झाल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अखेर आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संकेत कदम यांनी पुढाकार घेत १ मे रोजी नाचणे येथील टीआरपी येथे महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत महामार्ग अधिकारी राकेश सैनी यांच्यासमोर सर्विस रोड अपूर्ण असल्याने स्थानिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सर्विस रोड तसेच गटारांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, ‘आश्वासनांची हीच मालिका किती दिवस चालणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्य महामार्गाच्या कामाला प्राधान्य देताना सर्विस रोडसारख्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा आरोपही स्थानिकांनी केला. नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा कामाची केवळ पूर्तता दाखविण्याची घाई ठेकेदार कंपनीला आहे का, असा बोचरा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रशासक तथा सरपंच ऋषिकेश भोंगले यांनी स्पष्ट केले. या बैठकीस भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळा तोंडावर असताना अद्यापही काम रखडलेले असल्याने, वेळेत काम पूर्ण न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा कागदोपत्री प्रगतीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप देखील होत असून, आता तरी महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी वास्तवात उतरतील का, की पुन्हा एकदा केवळ आश्वासनांची धूळफेक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

