(रत्नागिरी / वार्ताहर)
समाजासाठी विनामूल्य कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात राहण्याची सुविधा तसेच प्रवासासाठी सवलत मिळावी, अशी मागणी चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख (ता. संगमेश्वर) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
संस्थेच्या वैदेही सुधीर सावंत यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, त्या एम.ए. (मराठी), एम.ए. (शिक्षण), एम.फिल., बी.एड., एलएलबी असून, यशदा पुणे व NIRD हैदराबादच्या स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील क्लास-वन अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय घटकांना प्रशिक्षण दिले असून, आतापर्यंत सुमारे ८० हजारांहून अधिक व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे. गेल्या २२ वर्षांपासून त्या समाजकार्यात सक्रिय असून संस्थेला १६ पुरस्कार, त्यात ४ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
चक्रभेदी सोशल फाउंडेशन ही संस्था विधवा व एकल महिला तसेच पर्यावरण विषयावर काम करत आहे. महिलांसाठी हळदी-कुंकू उपक्रम, ‘शिव्या मुक्त समाज’ अभियान, जीवन कौशल्य कार्यशाळा, तसेच ‘मायेचं हक्काचं घर’ या निवारा प्रकल्पावर संस्था कार्यरत आहे. कोणत्याही शासकीय निधीशिवाय संस्थेने सात महिलांना रोजगारासाठी टी-स्टॉल व आवश्यक साहित्य मोफत दिले असून, त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. सुमारे ५०० महिलांच्या विविध समस्या सोडवण्यात संस्थेला यश मिळाले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
- नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी CSR निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारस करावी
- राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या समाजसेवकांना शासकीय विश्रामगृहात राहण्याची व प्रवास सवलतीची सुविधा मिळावी
- विधवा व एकल महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आराखड्यात स्वतंत्र निधीची तरतूद करावी
- बालसंगोपन व संजय गांधी निराधार पेन्शन नियमित मिळावी
- विधवा व एकल महिलांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्यासोबत वैदेही सावंत यांनी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चर्चेदरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनाही दूरध्वनीवरून सहभागी करून घेत विधवा व एकल महिलांसाठी एकत्रित कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांनी CSR संदर्भातील शिफारस व समाजसेवकांना विश्रामगृह/प्रवास सवलतीसाठी परवानगी देणे त्यांच्या अधिकारात नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, बालसंगोपन व निराधार पेन्शन पात्र लाभार्थ्यांना नियमित मिळण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी संस्थेच्या दिपाली गावडे व संपदा राणा उपस्थित होत्या.

