(ठाणे / वृत्तसंस्था)
भाईंदर येथील उत्तन परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करताना झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात ३२ वर्षीय रितू चौधरी याचा होरपळून मृत्यू झाला. मात्र, या दुर्घटनेतून बेकायदा दारूभट्टीचा प्रकार उघड होऊ नये, यासाठी मृतदेह कामगाराच्या खोलीत नेऊन ठेवण्यात आला आणि त्यावर डिझेल ओतून खोलीला आग लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. जेवण बनविताना गॅसचा स्फोट होऊन आग लागल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावत सराईत गुन्हेगार सॅबस्टीन मेंडोसा, त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि पोलिसांना खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून पत्नी कॅरोल मेंडोसा यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
सरकारी जागेवर अतिक्रमण करून सॅबस्टीन मेंडोसा याने बेकायदा गावठी दारूची भट्टी सुरू केली होती. या ठिकाणी सॅबस्टीन, त्याचा सख्खा भाऊ संदीप आणि आणखी एक व्यक्ती दारू तयार करण्याचे काम करत होते. दारू निर्मितीसाठी पाणी गरम केले जात असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे गरम पाण्याची भांडी आणि सिलिंडर फुटले. या दुर्घटनेत रितू चौधरी (३२) गंभीररीत्या भाजला आणि त्याचा मृत्यू झाला. तर गरम पाणी अंगावर पडल्याने सॅबस्टीन आणि संदीप हे दोघेही जखमी झाले.
या घटनेनंतर बेकायदा दारूभट्टीचा पर्दाफाश होण्याची भीती असल्याने आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. दारूभट्टीच्या ठिकाणी मृत्यू झालेल्या रितूचा मृतदेह कामगारांच्या राहण्याच्या खोलीत हलविण्यात आला. त्यानंतर मृतदेहावर डिझेल टाकून संबंधित खोली पेटवून देण्यात आली. स्वयंपाक करताना गॅसचा स्फोट होऊन आग लागली आणि त्यात कामगाराचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती पोलिसांना देण्यात आली. सॅबस्टीनच्या पत्नीनेही पोलिसांसमोर हाच घटनाक्रम सांगितल्याने सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सॅबस्टीन मेंडोसा इगतपुरी येथे पळून गेला. दुसरीकडे, संदीप मेंडोसा याने घरातील बाथरूममध्ये गरम पाणी अंगावर पडल्यामुळे भाजल्याचे सांगितले आणि मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार घेतले.
सॅबस्टीन मेंडोसा याच्याविरोधात यापूर्वी १० ते १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो उत्तन परिसरात मुक्तपणे वावरत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, घटनेतील संशयास्पद बाबी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुन्हे शाखेने दारूभट्टीतील स्फोट आणि कामगाराच्या खोलीला लागलेल्या आगीचा परस्पर संबंध शोधून काढत संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पाठलाग करून मुख्य आरोपी सॅबस्टीन मेंडोसा याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना चुकीची माहिती देऊन तपासाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून त्याची पत्नी कॅरोल मेंडोसा हिलाही अटक करण्यात आली आहे. तर संदीप मेंडोसा याच्याविरोधातील पुढील कारवाईबाबत तपास सुरू आहे.


