(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने घरातील भांडी, कपडे, घरगुती साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रत्नागिरी शहरातील मजगाव रोड परिसरात उघडकीस आली आहे. १२ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही घरफोडी झाल्याचा संशय असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६३, व्यवसाय शेती, रा. मेस्त्री व्हिला, नाखरेकर चाळ, मजगाव रोड, रत्नागिरी; मूळ रा. नाखरेकरवाडी, मिरजोळे) यांचे घर बंद असताना अज्ञात व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील साहित्य आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरट्याने घरातील स्टीलची टाकी, हंडा, कळश्या, ताट-वाट्या, तांब्या, जर्मनची भांडी, तवा, परात, कुकर, स्टीलची शेगडी आणि क्रॉम्पटन कंपनीचा टेबल फॅन असा घरगुती वापराचा ऐवज लंपास केला. याशिवाय प्लास्टिकच्या खुर्च्या व टेबल, साड्या, शर्ट, पॅन्ट, टी-शर्ट, तांदूळ असलेला प्लास्टिकचा पिंप, चादरी, चटई, ब्लँकेट तसेच विविध डबेही चोरीला गेले आहेत.
या साहित्याबरोबरच घरात ठेवलेली सहा हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या सर्व वस्तू आणि रोख रकमेसह एकूण नुकसान ४९ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी विजय नाखरेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंद घराला लक्ष्य करून झालेल्या या चोरीचा तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


