(रत्नागिरी / तुषार पाचलकर)
तालुक्यातील मौजे मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी येथे कोलगे किराणा दुकानाजवळ लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकलेला असल्याची माहिती आज (दि. १ मे २०२६) सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिक नागरिक सागर शिवाजी कळंबटे तसेच माजी सरपंच गजानन गुरव यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनपाल, पाली यांनी तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना कळविले. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरात ग्रामस्थांची मोठी गर्दी झालेली होती. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हटवून पुढील कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांना देण्यात आली. ग्रामस्थांनी जाळीत पकडून ठेवलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतले.
मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वरूप काळे व डॉ. रानभरे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ उपचार सुरू केले. सध्या बिबट्याला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याला आवश्यक आहार देण्यात येत आहे. सदर बिबट्या मादी असून अंदाजे ६ ते ८ महिन्यांचा असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळले आहे. वन विभागाकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा शोध सुरू आहे.
या बचाव मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वनाधिकारी पाली एन. एस. गावडे, वनपाल (कांदळवन कक्ष) मिलिंद डाफळे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, प्राजक्ता चव्हाण, धनंजय यादव, चालक महेश धोत्रे, प्राणीमित्र ईशान खानोलकर तसेच स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
ही संपूर्ण कार्यवाही विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास त्वरित टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा.

