(खेड /प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील रसाळगड फाटा परिसरात पैशांच्या वादातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, खेड पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.
पुरे बुद्रुक येथील रहिवासी रामचंद्र राजेश पवार (वय ३५) यांनी खेड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मित्र मधुकर शंकर निकम (वय २६) आणि आरोपी यांच्यात काही काळापासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. याच वैमनस्यातून आरोपींनी अपहरणाचे धाडसी पाऊल उचलले, असा संशय व्यक्त केला जात आहे.
१० सप्टेंबर रोजी सायंकाळी रसाळगड फाटा परिसरात, पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या तिघा आरोपींनी मधुकर निकम यांना जबरदस्ती गाडीत बसवून नेले. ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३.०१ वाजता याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. या अपहरणप्रकरणी मुख्य आरोपी महेश जरग (रा. उब्रज, ता. पाटण, जि. सातारा) असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, त्याच्यासोबत दोन अज्ञात साथीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

