(मंडणगड)
तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत असून अवघ्या पाच दिवसांत विविध गावांतील तब्बल ११ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २५ ते २९ एप्रिल या कालावधीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२५ एप्रिल रोजी पालवणी येथील माया पवार (८५) आणि मंडणगड येथील तनुजा सापटे (१९) यांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानंतर २६ एप्रिल रोजी माहू येथील विक्रांत बाईत (३३), तर २७ एप्रिल रोजी पाट येथील गणेश जालगावकर (६०) जखमी झाले. २८ एप्रिल रोजी परिस्थिती अधिक गंभीर झाली. पाट येथील सुनंदा महागावकर (६०), शिरगाव येथील सक्षम गोसावी (१४) व शशांक चव्हाण (१०), तसेच मंडणगड येथील मनस्वी मर्चडे (१०) यांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. २९ एप्रिल रोजी भिंगळोली येथील ऋतुजा गावडे (२६), पीयूष मेहता (६) आणि मंडणगड येथील शुभम राजपूत (४) हे देखील या घटनांमध्ये जखमी झाले.
याशिवाय, मंडणगड येथील नलिनी पारेख (२६) यांना मांजरीने चावा घेतल्याची स्वतंत्र घटना घडली आहे. सर्व जखमींवर मंडणगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

