(मंडणगड)
मंडणगड नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या विकास आराखड्यासाठी प्रस्तावित जमीन वापर आराखड्याला (Proposed Land Use – PLU) नगररचना कार्यालयाने मंजुरी दिली असून, नागरिकांच्या सूचना व हरकतींसाठी १२ जुलै २०२५ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
प्रस्तावित आराखडा मंडणगड नगरपंचायत कार्यालयात प्रदर्शित करण्यात आला असून, त्यावर नागरिकांनी आपली मते, सूचना, हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकल्पाची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, नगराध्यक्षा ॲड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक आदेश मर्चडे, नगरसेविका रेश्मा मर्चडे, तसेच प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रस्तावित आराखड्यानुसार मंडणगड शहरातील जमिनींची झोननिहाय विभागणी करण्यात आली आहे. यात निवासी आरक्षण झोन, व्यावसायिक आरक्षण झोन, सार्वजनिक व निमशासकीय झोन कृषी, औद्योगिक व वाहतूक झोन यांचा समावेश आहे. शिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट व शहर वाहतूक व्यवस्था यांचाही विचार या आराखड्यात करण्यात आला आहे.
नागरिकांच्या सूचना महत्त्वाच्या
आराखड्यात अजून कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत? काय टाळायला हवे? यासंदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना लेखी स्वरूपात मागवण्यात आल्या आहेत. या सूचना विचारात घेऊन दुरुस्त आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू
या संदर्भातील माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नगरपंचायतीकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयाशी थेट संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी केले आहे.